प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालयासाठी लवकर प्रस्ताव सादर झाल्यास तत्काळ मंजुरी देण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्याने प्रस्तावाच्या कामाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेच्या निश्चितीअभावी प्रस्तावच रखडल्याचे पुढे येत आहे. मात्र आता जिल्हा शासकीय रूग्णालय, मनोरूग्णालय व महिला रूग्णालय या 3 जागांची प्राथमिक निवड करून तसा आराखडा आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला. यात जागेची अंतिम निवड झाली की, वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग काही दिवसांत मार्गी लागण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली, मात्र रत्नागिरीत मंजुरी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही हे काम नेमके कशामुळे रखडले याबाबत चर्चा सुरु झशली होती. नुकतेच रत्नागिरी जिल्हय़ात प्लाझा थेरपी सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते झाले यावेळी रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयालाही मान्यता देणार असून लवकरात लवकर यासाठी प्रस्ताव द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने, हे कारण स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्र्यांकडे प्रस्तावच सादर न झाल्याने हे काम रखडल्याचे पुढे येताच यंत्रणा गतीमान करण्यात आल्याचे समजते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्ताव तयार होता मात्र आरोग्य प्रशासनासमोर जागेचा प्रश्न असल्याने त्याला अंतीम स्वरूप मिळाले नसल्याचे यातून पुढे आले.
आता रत्नागिरी येथीलच तीन जागांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे यामध्ये जिल्हा शासकीय रूग्णालय, महिला रूग्णालय आणि मनोरूग्णालय या तीन रूग्णालयांचा समावेश आहे. या जागेची माहिती राज्य आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आली आहे यानंतर प्रशासन यापैकी कोणती जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वात योग्य आहे याबाबत निर्णय घेईल. जागेचा निर्णय झाल्यानंतर रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला त्वरीत मंजूरी मिळेल, असे सांगण्यात येत आहे.









