प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरमधील नम्म मेट्रो रेल्वे योजनेच्या 2 अ आणि 2 ब टप्प्यातील कामांना केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. केंदीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. मेट्रो रेल्वेचा 2 अ टप्पा सेंट्रल सिल्क बोर्ड जंक्शनपासून के. आर. पुरमपर्यंत आणि 2 ब टप्पा के. आर. पुरमपासून हेब्बाळ जंक्शनमार्गे विमानतळापर्यंत वाढविण्यात आला आहे. एकूण 58.19 कि. मी. लांबीच्या या मेट्रो रेल्वे मार्गासाठी 14,788 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती गोयल यांनी दिली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी याविषयी ट्विट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. बेंगळूर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येला पर्याय म्हणून मेट्रो रेल्वेकडे बघितले जाते. प्रामुख्याने सेंट्रल सिल्क बोर्ड जंक्शन परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते.









