बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक समस्या उद्भवत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात बऱ्याच वेळेला बेडची कमतरता भासत असल्याने बीएमआरसीएलने मेट्रो प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या आपल्या कर्मचार्यांची आणि बांधकाम कामगारांची काळजी घेण्यासाठी होसूर रोडवर हॉटेल भाड्याने घेऊन १०० बेडच्या कोविड केअर सेंटरची स्थापना केली आहे.
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नम्मा मेट्रो फेज २ च्या बांधकामांसाठी कंत्राटदारांमार्फत सुमारे ८ हजार कामगारांना कामावर घेतले आहे. बहुतेक कामगार हे राज्याबाहेरील आहेत. “बीबीएमपीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने संपूर्ण हॉटेल भाड्याने घेऊन ही सीसीसी सुविधा स्थापन करण्यात आली आहे,’ असे बीएमआरसीएलने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हे केंद्र ऑक्सिजन केंद्रे आणि सिलेंडर्सने सुसज्ज आहे. “सीसीसीमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या बीएमआरसीएलच्या कर्मचारी आणि बांधकाम कामगारांवर उपचार केले जाणार आहेत, असे ”प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.









