ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीला फिलिपाईन्सने दिली मंजुरी
वृत्तसंस्था / मनीला
भारताची मेक इन इंडिया मोहीम आणि संरक्षण क्षमता निर्मिती कौशल्याला मोठी चालना मिळाली आहे. फिलिपाईन्सने भारतीय ब्राह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या 374.9 दशलक्ष डॉलसंच्या प्रस्तावाला स्वतःच्या नौदलासाठी शोर-बेस्ड अँटीशिप मिसाइल सिस्टीम अधिग्रहण प्रकल्पाकरता स्वीकारले आहे. लवकरच दोन्ही देशांदरम्यान यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी होणार आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी ही पहिलीच विदेशातून आलेली मागणी आहे.
या खरेदीच्या करारासाठी देण्यात आलेल्या नोटीसमध्ये ब्राह्मोस एअरोस्पेसलग 10 दिवसांच्या आत भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. ब्राह्मोसच्या विकासासाठी भारत आणि रशिया यांच्यात एक भागीदारी आहे. ब्राह्मोस एक शक्तिशाली आक्रमक क्षेपणास्त्र प्रणाली असून याचा वापर भारतीय नौदल, वायुदल तसेच सैन्याकडून केला जातो.
फिलिपाईन्सचे वाढणार बळ
फिलिपाईन्सचा चीनसोबत दक्षिण चीन समुद्रात अधिकारक्षेत्रावरून वाद सुरू आहे. याचदरम्यान फिलिपाईन्सकडून जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या सैन्याच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे. या क्षेपणास्त्राच्या मदतीने फिलिपाईन्स चीनला डोळे वटारून दाखवत स्वतःच्या किनारी भागांचे रक्षण करू शकेल.
अत्यंत वेगवान क्षेपणास्त्र
ब्राह्मोस एअरोस्पेस हा भारत-रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते, या क्षेपणास्त्रांना पाणबुडी, युद्धनौका, विमान किंवा जमिनीवरूनही डागले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा 3 पट अधिक वेगाने उड्डाण करू शकते. हे क्षेपणास्त्र सुमारे 290 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. मागील काही काळात फिलिपाईन्सने स्वतःच्या सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी अनेक संरक्षण करार केले आहेत.









