पूल कोसळल्याने मेट्रो जमिनीवर ः 49 जण जखमी
@ वृत्तसंस्था / मेक्सिको सिटी
मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये एक पूल कोसळला आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजता (स्थानिक प्रमाणवेळ) पुलावरून मेट्रो धावत असतानाच ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 20 जणांना जीव गमवावा लागला असून 49 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.
या दुर्घटनेची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मेट्रोचे डबे लटकताना दिसून येत आहेत. तसेच दुर्घटनास्थळी लोकांची मोठी गर्दीही दिसून येतेय. तर पुलाखाली उभ्या असलेल्या कारही याच्या तावडीत सापडल्याने ढिगाऱयाखाली अडकून पडल्या आहेत.
दुर्घटनेची माहिती मिळताच मेक्सिको सिटीच्या महापौर क्लाउडिया शिनबाउम यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि बचावपथक लोकांना मदत करत आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून ढिगाऱयाखाली अनेक जण अडकून पडले असावेत अशी भीती व्यक्त होत आहे. लोकांचा शोध घेतला जात आहे.
मेक्सिकोचे विदेशमंत्री मार्सेलो एबरार्ड यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मेट्रोसोबत जे काही घडले ते अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेची चौकशी करत दोषींना शिक्षा मिळवून देण्यात यावी असे म्हणत एबरार्ड यांनी शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.









