आणखी तिघे फरारी ः 24 तासांत पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
विजयनगर, हलगा येथील मेकॅनिक युवकाचा खून केल्याच्या आरोपावरून शहापूर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर केवळ 24 तासांत त्रिकुटाला अटक करून पोलिसांनी या भीषण खुनावर प्रकाश टाकला आहे. आणखी तिघेजण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नागराज मारुती तळवार (वय 23) रा. तारिहाळ, सुरेश मंजुनाथ हुलमनी (वय 19) रा. मारुती गल्ली, वड्डर छावणी, खासबाग, भरमा परशराम कांबळे (वय 28) रा. आंबेडकर गल्ली, शहापूर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
रविवारी सकाळी या त्रिकुटाला अटक झाली आहे. दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
शुक्रवार दि. 13 मे रोजी रात्री महेश ज्ञानेश्वर कामाण्णाचे (वय 35) रा. तारिहाळ रोड, विजयनगर, हलगा या मेकॅनिक युवकाचा जांबियाने भोसकून खून करण्यात आला होता. खुनानंतर आरोपी फरारी झाले होते. महेशचे वडील ज्ञानेश्वर यांच्यासह सहाजणांवर हल्ला करण्यात आला होता.
खून झालेला महेश हा उप्पार गल्ली, खासबाग येथे प्रसाद ऑटो गॅरेज चालवत होता. शुक्रवारी एक वॅगन-आर कार दुरुस्ती केल्यानंतर तिची ट्रायल घेण्यासाठी कारमालकासह तो जुन्या पी. बी. रोडवर गेला होता. त्यावेळी मोटारसायकलची कारला धडक बसून वादावादीचा प्रसंग घडला होता. क्षुल्लक कारणावरून जांबिया, सायकल चेनने हल्ला करून मेकॅनिक युवकाचा भीषण खून करण्यात आला होता.
रंगीत पार्टीनंतर धडक
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांपैकी नागराज हा गवंडी काम करतो. शुक्रवारी सायंकाळी शगनमट्टी येथे पार्टी रंगली होती. पार्टी सुरू असतानाच कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत म्हणून आपल्या मोटारसायकलवरून नागराज बेळगावला आला. त्याचवेळी बळ्ळारी नाल्याजवळ महेश कार ट्रायल घेण्यासाठी जात होता. त्यावेळी मोटारसायकलची कारला धडक बसली. वादावादी झाली. वादावादीनंतर नागराजने पार्टीसाठी आलेल्या आपल्या मित्रांना बोलावून घेतले. तोपर्यंत महेश कार घेऊन धाकोजी हॉस्पिटलपर्यंत पोहोचला होता. नागराजने मोटारसायकल आडवी लावून कार अडविली. पुन्हा भांडण झाले. त्यानंतर मेकॅनिकचा खून करून त्याचे वडील व त्याच्या कामगारांवर हल्ला करण्यात आला.









