रामनगर जिल्हय़ातील आयजूर येथील घटना
प्रतिनिधी / बेंगळूर
निर्मितीच्या टप्प्यात असणाऱया मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना शुक्रवारी दुपारी रामनगर जिल्हय़ाच्या आयजुरु येथे घडली. मंजुनाथ (वय 29), मंजुनाथ (32) आणि राजेश (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्वजण बेंगळूरच्या कमलानगर येथील रहिवासी आहेत.
आयजूर येथील वॉर्ड क्र. 30 मध्ये भुयारी गटारीचे काम सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात असून मॅनहोल बांधण्याचे काम गुरुवारी सुरू होते. त्याकरिता तिघे कामगार 15 फूट खाली उतरले होते. सुरुवातीला राजेश खाली उतरला. तोल गेल्याने तो पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मदतीला गेलेल्या अन्य दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनेचे माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन कर्मचाऱयांनी ऑक्सिजन मास्क परिधान करून मॅनहोलमधील मृतदेह बाहेर काढले. उपविभाग अधिकारी मंजुनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.









