पैरा मयेतील प्रकार. गावातील अनेकांच्या घेतल्या गेल्या स्वेब टेस्ट. नंतर आलेला अहवाल कोराना नकारात्मक निघाला. कोण चुक आणि कोणी बरोबर हे कळायला मार्ग नाही.
डिचोली / प्रतिनिधी
चौगुले कॉलनी पैरा मये येथील एका मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याची अफवा शासकीय पातळीवरूनच सोम. रि. 13 जुलै रोजी पसरल्याने मये पंचायत क्षेत्रात एकच धावपळ उडाली. रात्रीच पैरातील सर्व रस्ते अडवून पोलीस जीपमधून लोकांना बाहेर न पडण्याची सुचना देण्यात आली. दुसऱया दिवशी म्हणजे मंगळ. दि. 14 रोजी सकाळी चौगुले कॉलनी पैरातील लोकांच्या मये प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे स्वेब टेस्टही घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. आणि दुपारनंतर सदर मृत व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक असल्याचे उघड होताच या शासकीय पातळीवरील गलथानपणाविरोधात मयेत एकच संताप पसरला.
या प्रकरणी उपलब्ध माहितीनुसार, पुढे रा मये येथील चौगुले कॉलनीत राहणारा चंद्रकांत चिकोडी या वृध्द मूत्रपिंडाच्या आजारामुळे प्रथम आजिलोत व नंतर बांबोळीतील गोमेकॉत भरती होता. त्याचा या दोन दिवसांत बांबोळीतील 113 वॉर्डमध्ये त्यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांची कोवीड चाचणी घेतली असता ती सकारात्मक आल्याची माहिती सर्वत्र पसरली. मये पंचायत, आरोग्य केंद्र व पोलीस स्थानक या पर्यंत सदर माहिती पसरल्यानंतर या भयानक परिस्थितीत खबरदारी घेण्याच्या उद्देशाने सर्वच यंत्रणा कामाला लागली.
सकारात्मक अहवाल झाला दुपारी नकारात्मक.
रात्री पोलीस जीपमधून पैरा गावात जाहिर सुचना देण्यात आली. चौगुले कॉलनी पैरा येथे राहणारा सदर इसम कोरोनामुळे मृत झाल्याने या भागातील लोकांनी घरातून बाहेर पडू नयेत. तर या लोकांची सकाळी कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानुसार सदर भागातील सर्व रस्ते अडळून तो वाडाच सील करण्यात आला. तसेच मंगळ. दि. 14 जुलै रोजी सकाळी मये सरकारी आरोग्य केंद्रात सदर भागातील लोकांच्या स्वेब चाचण्याही घेण्यात आल्या. व त्यानंतर सदर मृत इसमाचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक असल्याची बातमी धडकताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.
कोणी पसरविला चुकीचा संदेश ? मयेत मात्र तीव्र नाराजगी
या प्रकरणात कोणी चुकीच संदेश दिला, की खुद्द आरोग्य खात्यातर्फेच गोंधळ घालण्यात आला आहे. या बध्दल कळायला मार्ग नाही. मात्र अशा प्रकारच्या नाजूक व संवेदनशील परिस्थितीत असे चुकीचे संदेश शासकीय पातळीवरच फैलावणे आणि सरकारी यंत्रणा त्यादृष्टीने कामालाही लागणे. हि गोष्ट न पटण्यासारखी आहे. या प्रकरणाचे मात्र तीव्र पडसाद मये पंचायत क्षेत्रात ऊमटले. मयेवासीयांनी या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या राज्यात वाढत असलेल्या कोरोना रूग्णांमुळे संपूर्ण राज्यातच भितीचे वातावरण पसरले असताना कोवीडच्या संदर्भात अशा प्रकारचा बेजबाबदार प्रकार घडणे म्हणजे आरोग्य खात्याचा दुर्लक्षितपणा चव्हाटय़ावर आणणारा आहे, अशी टिका अनेकांनी केली.
आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – विजय पोळे.
मयेतील मृत झालेल्या इसमाला कोरोनाची बाधा असल्याचे सर्वत्र पसरल्यानंतर त्याचा अहवाल एकदा सकारात्मक येतो आणि लगेचच त्याचा अहवाद नकारात्मक म्हणून समजतो. हा प्रकार म्हणजे आधीच भितीच्या सावटाखाली असलेल्या लोकांना अधिकच भितीत लोटणारा आहे. यावरून संबंधित खात्यातील लोकांचे तसेच आरोग्यमंत्र्यांचे सुध्दा या खात्याच्या कारभाराकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट होते. या प्रकारणात आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी लक्ष घालावे, अशी मागणी पैरातील पंचसदस्य विजय पोळे यांनी केली आहे.
मयेत कोरोना रूग्ण नाही हि बातमी दिलासादायक – सरपंच.
सोमवारी संध्याकाळी पैरा मयेतील एका इसमाचा बांबोळीतील गोमेकॉत निधन झाले असून त्याला कोरोनाची बाधा होती. अशी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम संभ्रमात पडलो. मयेत तर कोणालाही कोरोना नाही, किंवा या गावात कोरोनाचे रूग्ण अद्याप आढळलेले नाही. आणि असे असताना मृत झालेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी संभ्रमात टाकणारी होती. तरीही आम्ही पंचायतीमार्फत संपूर्ण पैरात जी काही खबरदारी घ्यायची होती ती घेतली. पोलीसांनीही आपली कामगिरी बजावली. तसेच आरोग्य केंद्रानेही लोकांच्या स्वेब टेस्ट घेतल्या. मात्र दुपारनंतर सदर इसमाचा अहवाल हा कोरोना नकारात्मक आल्याची नवीन बातमी धडकली. आणि नंतर दिलासा वाटला. मयेत अद्याप कोरोनाचे रूग्ण नाहीत हि बाब दिलासादायक असून मये पंचायत मये पंचायतक्षेत्रात याबाबतच्या जागृतीसाठी योग्य कार्य करीत आहे, असे मयेचे सरपंच तुळशीदास चोडणकर यांनी सांगितले.










