देशात बाधितांचा आकडा 71 लाखांवर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात कोरोना विषाणू संक्रमितांची संख्या 71 लाख 20 हजार 538 वर पोहोचली आहे. रविवारी, 24 तासात 66 हजार 732 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच आतापर्यंत 1 लाख 9 हजार 150 रुग्ण संसर्गामुळे मरण पावले आहेत. मात्र आता मृतांचा आकडाही कमी होऊ लागला असून दिवसभरातील मृतांची संख्या 800 च्या घरात पोहोचली आहे. भारतात आता मृत्यूदरात सतत घट आणि सक्रिय प्रकरणांच्या दरांची नोंद केली जात आहे. मृत्यूची संख्या 1.54 टक्के वर घसरली आहे. याव्यतिरिक्त, उपचार घेत असलेल्या सक्रिय प्रकरणांचे प्रमाणही 12 टक्के पर्यंत खाली आले आहे. दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑक्टोबरपर्यंत कोरोना विषाणूची एकूण 8.78 दशलक्ष नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी रविवारी एका दिवसात 10 लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.
देशात आतापर्यंत 61 लाख 49 हजार 536 लोक उपचाराअंती बरे झाले आहेत. त्याचबरोबर 8 लाख 61 हजार 853 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. जगातील संक्रमित लोकांमध्ये भारत दुसऱया क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर जास्तीत जास्त मृत्यूच्या बाबतीत भारत तिसऱया क्रमांकावर आहे.
जगातील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत, अमेरिका, ब्राझील, रशिया, कोलंबिया, अर्जेंटिना आहेत. त्याच वेळी, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, अर्जेंटिना या देशात आहेत.