विजय जाधव / गोडोली
शनिवार दि. २८ मार्च,गाव गोळेवाडी, दुपारी १२ च्या दरम्यान, गजानन पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.पत्नी परगावी, घरात फक्त वृध्द आई आणि बहिणीचा आक्रोश सुरू झाला.अन् काही क्षणात साऱ्या गावात ही वार्ता समजली. मात्र अख्ख्या गावातील एकजणही डोकावून पाहण्यासाठी फिरकला नाही. कोणीतरी तहसिलदारांना खबर कळवली. त्यांनी तलाठय़ांना आदेश करून पुढील अंत्यसंस्कार करण्यासाठी सूचना दिल्या. तलाठी महाशय गावाकडे फिरकले नाहीत. तब्बल २२ तास मृतदेह घरात राहिल्याने दुर्गंधी पसरू लागली. गजाननच्या आई, बहिणीने अनेकांना अंत्यविधीसाठी आवाज दिला. मात्र कोणीही आले नाही. अखेर पोलीस पाटील दीपक शिंदे, ग्रामसेवक नीलेश बर्गे,सतिश गोळे, महेश बर्गे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश कदम, नवनाथ पवार यांनी रविवार दि.२९ रोजी अंत्यसंस्कार केले. जवळचा एकही नातेवाईक, ग्रामस्थ न आल्याने ग्रामसेवक नीलेश बर्गे यांनी भडाग्नी दिला. कोरोनाची दहशत आणि संचारबंदीमुळे अत्यंसंस्कारालाही कोणीही ना नात्यातील, ना गावातील आले नसल्यामुळे माणुसकीही आटली असेच म्हणावे लागेल. जगभरात कोरोनाची दहशत आणि त्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदी लागू केल्याने ग्रामीण भागात ही घराबाहेर कोणी पडत नाही.
कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडीत गजानन पवार हे वृध्द आई आणि बहिणी सोबत राहत होते. काही दिवसांपासून पत्नी विभक्त राहते. शनिवार दि.२८ रोजी गजानन पवार यांचे दुपारी १२ च्या सुमारास अल्पशा आजाराने घरीच निधन झाले. आई, बहिणीने नात्यात, गावात अनेकांना आवाज दिला. मात्र कोणीच फिरकले नाही.या घटनेची माहिती तहसिलदारांना कळविली. त्यांनी तलाठय़ांना योग्य सहाय्य करण्याचे आदेश दिले. पण तलाठय़ांनी फोनाफोनी करून गावातून मदत देण्याचा प्रयत्न केले. पण यश आले नाही.शेवटी मोबाईल बंद करून तलाठय़ांनी आदेश आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष केले.सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्यांना घटना माहिती होऊनही ते सुध्दा फिरकले नाहीत.
तब्बल 22 तास झाल्याने मृतदेहाची दुर्गंघी सुटली. ज्यांना त्याचा वास येत होता ती मंडळी एकमेकांना फोनाफोनी करत यातून आपली सुटका व्हावी,असा प्रयत्न करत होती. मात्र घराबाहेर आली नाही.शेवटी ग्रामसेवक निलेश बर्गे,ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश कदम,नवनाथ पवार यांनी पुढाकार घेत पोलीस पाटील दीपक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतिश गोळे,महेश बर्गे यांनी कोरेगाव नगरपंचायतीचा वैंकुंठ रथ बोलावून त्यातून गजानन पवार यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभुमीत पोहचले.ना घरातील,ना गावातील कोणी यावेळी उपस्थित नसल्याने अखेर ग्रामसेवक निलेश बर्गे यांनी भडाग्नी दिला. सदर घटनेवर असल्याने आता माणूस मेला तरी ही गावातील कोणी पुढे येणार नाही, असाच संदेश देणाऱ्या गोळेवाडीच्या या घटनेची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.









