कोरोनामुळे दोन कुटुंबांवर ओढवले अकल्पित प्रसंग : ओरोस, पडेल येथील घटना
संदीप गावडे / सिंधुदुर्गनरी:
कोरोनच्या संकटात अनेकांबाबत अशा काही घटना घडत आहेत, की त्यांनी त्याची कधी कल्पनाही केली नसेल. ओरोस येथील जाधव कुटुंबातील सर्व पाचजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गणेश चतुर्थी दिवशीच प्रतिष्ठापणा केलेली गणेश मूर्ती घरात ठेवून सर्वांना कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावं लागल्याची घटना घडली, तर देवगड तालुक्यातील पडेल येथील काणकेकर कुटुंबाचे घरच ‘कंटेंटमेंट झोन’ करण्यात आल्याने मूर्ती आणण्यासाठी त्यांना बाहेर पडता न आल्याने घरातीलच चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी लागली.
कोरोनच्या या वैश्विक महामारीमध्ये अनेकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांवर आर्थिक अरिष्ट ओढवले. कोरोनामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला. ज्यांना जीव गमवावा लागला, त्यांच्यातील कित्येकांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत. अगदी रक्ताच्या नात्यातही दुरावा निर्माण होण्याच्या घटना घडल्या. आता एकीकडे गणेशोत्सवाचे वातावरण असल्याने सर्वत्र उत्साह असताना, दुसरीकडे अशा काही घटना घडत आहेत, की ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.
ओरोस जाधववाडीमधील जाधव नामक तरुण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहे. समुपदेशन पद्धतीने शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांवेळी कोरोना बाधित एक शिक्षक तिथे उपस्थित राहिला. त्या शिक्षकाच्या संपर्कात आल्याने सिंधुदुर्गनगरीतील या कर्मचाऱयाला 17 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलगी, आई आणि वडील या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल गणेश चतुर्थी दिवशीच दुपारी प्राप्त झाला. सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला. त्यांना काय करावे, हेच सुचेना. गणेशोत्सवाच्या आनंदावर एका क्षणात विरजण पडले.
कुटुंबातील सर्वच व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने घरात थांबायचे कोणी, हा प्रश्न निर्माण झाला. जिल्हा रुग्णालयातून त्यांना उपचारासाठी नेण्यास आलेल्या कर्मचाऱयांना त्यांनी, एक दिवस थांबून दीड दिवसांनी गणेश विसर्जन करून येतो, अशी विनंती केली. मात्र कोरोनाचे संकटच मोठे असल्याने त्यांनी ती मान्य केली नाही. शेजारीही जबाबदारी घेईनात. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव प्रतिष्ठापना केलेली गणेश मूर्ती असतानाही घर बंद करून सर्वांनाच जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये जावे लागले. जाधव कुटुंबातील सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
देवगड तालुक्यातील पडेल येथे राहणाऱया काणकेकर कुटुंबात आठ दिवसांपूर्वी एकाला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर एकजण वगळता घरातील सर्वांना कोरोनाची बाधा झाली. बाधित सर्वांना देवगडच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे काणकेकर कुटुंबाचे घर कंटेंटमेंट झोन करण्यात आले. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचे संकट आल्याने काणकेकर कुटुंबालाही धक्का बसला. मात्र कुटुंबातील एक व्यक्ती निगेटिव्ह आल्याने गणेशमूर्ती प्रतिष्ठापणेचा प्रश्न सुटेल, अस वाटत होतं. मात्र घरच कंटेंटमेंट झोन केल्यामुळे त्या व्यक्तीलाही घरातून बाहेर पडता येत नव्हते आणि कुणी मूर्ती आणून द्यायची, तर कंटेंटमेंट झोनमुळे आणता येत नव्हती. नंतर पुरोहितांशी मोबाईलवर संपर्क साधून सल्ला घेण्यात आला आणि त्यानुसार घरात असलेल्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
केवळ या दोन कुटुंबावरच नव्हे, तर कोरोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने वाढू लागल्याने कमी-अधिक प्रमाणात अनेकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचे हे विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावे, अशीच प्रार्थना घरोघरी केली जात आहे.









