बिहार निवडणुकीत एआयएमआयएमची लक्षवेधक कामगिरी : राजद अन् काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱया एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विजयाचे शेय बिहारच्या जनतेला देत काँग्रेस आणि राजदवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. मुस्लीम मतदार कुणाचेच गुलाम नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचा ‘ब’ संघ असल्याचे म्हणणाऱयांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राजदने काँग्रेसला 70 जागा दिल्या नसत्या तर ही स्थिती निर्माण झाली नसती असे त्यांनी म्हटले आहे. एआयएमआयएमने राज्यातील 20 जागांवर उमेदवार उभे केले होते, यातील 5 जण विजयी झाले आहेत.
बिहार निवडणुकीच्या 7-8 महिन्यांपूर्वी राजदच्या दोन वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली होती. आघाडीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले होते, आम्ही प्रयत्न केला होता, परंतु राजदला आघाडी करायची नव्हती. सद्यकाळात मतदार कुणाचेच गुलाम नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला 70 जागा देणे घोडचूक
काँग्रेसला राज्यात 70 जागा देणे घोडचूक होती. काँग्रेसला केवळ 19 जागांवर विजय मिळविता आला आहे. विजय मिळविण्यात सर्वात खराब कामगिरी करणाऱया पक्षाला अधिक जागा दिल्या आणि आमच्याशी आघाडी करण्यास टाळाटाळ केल्यानेच राजदला सत्ता गमवावी लागल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.
राजद, काँग्रेस लक्ष्य
मुस्लीम कुणाचेच गुलाम नाहीत. मतदारांना गृहित धरणे म्हणजे त्यांचा अपमान करणे आहे. मतदार गुलाम असल्याचा आणि आपण इच्छू तेच घडेल असे मानणाऱयांचे दिवस संपले आहेत. लोकांची कामे करून त्यांची मने जिंकावी लागणार असल्याचे म्हणत ओवैसी यांनी राजद आणि काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
भाजपची ए टीम
भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावर आक्षेप आहे. मला भाजपची ए टीम करा. आमच्यावर जितके अधिक आरोप होतील, आमचा उत्साह तेवढाच वाढणार आहे. आरोप करणारे भाजपला पराभूत करू शकत नाहीत आणि ओवैसीच भाजपला पराभूत करू शकतो असे लोक आता मानू लागले आहेत. आरोप करणारे नैराश्यग्रस्त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
…तर ही स्थिती नसती
महाआघाडीने योग्यप्रकारे काम केले असते, तर ही स्थिती निर्माण झाली नसती. राज्यात आम्ही 20 जागा लढविल्या आणि 5 जागांवर विजयी झालो, रालोआला यातील 6 तर महाआघाडीला 9 जागा जिंकता आल्या, महाआघाडीने योग्यप्रकारे प्रचार केला असता तर त्यांना 5 जागांची कमतरता भासली नसती, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.









