सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
वृत्तसंस्था/ धनबाद
सरसंघचालक मोहन भागवत यांनी झारखंड दौऱयादरम्यान संघटनेबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. महिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या जाऊ इच्छित असल्यास त्यांचे स्वागत आहे. संघाला महिलांबद्दल कुठलाच आक्षेप नाही. राष्ट्र सेवा समितीत सामील होऊन महिला पूर्वीच काम करत आहेत. याचबरोबर मुस्लिमांनी संघाच्या शाखेत यावे आणि आमचे विचार जाणून घ्यावेत असे भागवत यांनी धनबाद येथील स्वतःच्या तीन दिवसीय दौऱयादरम्यान म्हटले आहे.
बुद्धिवंतांसोबत झालेल्या एका बैठकीला त्यांनी संबोधित केले आहे. संघात महिलांची भागीदारी असायला हवी ही बाब 30 वर्षांपूर्वी देखील मांडली गेली होती. पण तेव्हा तेव्हा त्यावर चर्चा झाली नव्हती. सद्यकाळात स्थितीत परिवर्तन घडून आले आहे. महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात असे भागवत म्हणाले.
मुस्लीम समुदायाचे लोक संघात सामील होऊ इच्छित असल्यास त्यांचे स्वात आहे. त्यांनी संघाच्या शाखेत यावे आणि आमच्या कार्यांना जाणून घ्यावे आणि आमचे विचार समजून घ्यावेत. संघ सेवाकार्य करत आला आहे. भारत एक हिंदूराष्ट्र आहे, याकरता कुठल्याही पुराव्याची गरज नाही. येथील आमच्या मुस्लीम समुदायाचे लोक अरब जगतातून आलेले नाहीत. ते सर्व येथीलच आहेत, त्या सर्वांचे पूर्वज हिंदूच होते. सर्वांचा डीएनए एकच आहे. भारताच्या सर्व लोकांचा संस्कार एकच आहे, असे उद्गार सरसंघचालकांनी काढले आहेत.
देशात आता लॉकडाउनसारखी सिथती नाही. कोरोनाच्या मागील दोन लाटांप्रमाणेच तिसऱया लाटेच्या भीती पाहता सेवाकार्याची पूर्ण तयारी ठेवली जावी. स्वयंसेवकांनी मास्क, सॅनिटायजर आणि शारीरिक अंतराची नेहमीच काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.









