इस्लामिक देशांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मांडली भूमिका : हिंसाचारासमोर झुकणार नाही
वृत्तसंस्था/ पॅरिस
इस्लामला दहशतवादाशी जोडल्यामुळे टीकेचा भडिमार झेलणारे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे महत्त्वाचे विधान आले आहे. मुस्लिमांचा मी आदरच करतो. व्यंगचित्र निर्माण करण्यात आल्याने ते दुखावले गेले आहेत, हे मी समजू शकतो. तरीही याच्या प्रतिक्रियेदाखल हिंसाचार सहन केला जाऊ शकत नसल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. हिंसाचारासमोर फ्रान्स कदापिही झुकणार नाही असे मॅक्रॉन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
धार्मिक संघर्षामुळे दोन आठवडय़ांमध्ये झालेल्या दोन हल्ल्यांनी फ्रान्सला हादरवून सोडले आहे. सर्वप्रथम वर्गात वादग्रस्त व्यंगचित्र दाखविणाऱया शिक्षकाचा त्याच्याच विद्यार्थ्याने गळा चिरला होता. त्यानंतर नीस शहरात चर्चबाहेर चाकू मारून एका महिलेसह 3 जणांची हत्या करण्यात आली होती. शनिवारीही एका अज्ञात बंदुकधाऱयाने चर्चच्या पाद्रीवर गोळय़ा झाडल्या आहेत. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
इस्लामिक दहशतवादाची उपमा
सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे सरकारने फ्रान्समध्ये तैनात सैनिकांची संख्या दुप्पट केली आहे. मॅक्रॉन यांनी या घटनांना इस्लामिक दहशतवाद ठरविले होते. तेव्हापासून मॅक्रॉन हे मुस्लिम देशांच्या नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. अनेक देशांमध्ये प्रेंच उत्पादनांवर बहिष्कारासाठी मोहीम राबविली जात आहे.
व्यंगचित्राचे समर्थन नाही
पूर्ण प्रकरणाला चुकीच्या दृष्टीकोनातून समजले जात आहे. मी संबंधित व्यंगचित्राचे समर्थन करत नाही. या व्यंगचित्राने अनेक लोकांच्या भावनांना ठेच पोहोचविली आहे. तरीही देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात येणार आहे. यात व्यंगचित्र प्रसिद्ध करणेही सामील असल्याचे मॅक्रॉन यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हटले आहे.
दहशतवादाच्या विरोधात
फ्रान्सच्या नीस शहरामध्ये चर्चच्या परिसरात चाकूने तीन जणांची हत्या करणाऱया दहशतवाद्याच्या कुटुंबाने या हल्ल्याची चित्रफित दाखविण्याची मागणी केली आहे. दहशतवादी इब्राहिम ईसाओई हा टय़ुनिशियाचा रहिवासी होती. आम्ही मुस्लीम असून दहशतवादाच्या विरोधात आहोत असे त्याच्या भावाने म्हटले आहे. माझ्या मुलाने कशाप्रकारे हा दहशतवादी हल्ला घडवून आणला हे सत्य जाणून घ्यायचे असल्याचे इब्राहिमची आई गामरा यांनी सांगितले आहे.
तीन देशांकडून तपास
मुख्य संशयित इब्राहिम ईसाओईने हा हल्ला एकटय़ाने घडवून आणला का किंवा यात पुर्वनियोजित कट होता याचा शोध लावण्याचा प्रयत्न फ्रान्स, इटली आणि टय़ुनिशियाकडून सुरू आहे. इब्राहिम मागील महिन्यातच इटलीमार्गे फ्रान्समध्ये पोहोचला होता. इटलीने इब्राहिमला आश्रय देण्यास नकार दिला होता.
फ्रान्सनंतर कॅनडात हल्ला
फ्रान्सनंतर कॅनडात एका व्यक्तीने काही जणांवर चाकूने हल्ला केला आहे. क्यूबेक शहरात रविवारी झालेल्या या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी पूर्ण भागाची नाकाबंदी केली आहे. एका संशयिताला पकडण्यास यश आले आहे. हल्लेखोराने प्राचीन योद्धय़ांसारखा पोशाख घातला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याचे आणि हल्ला झालेल्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.









