चेन्नई / वृत्तसंस्था
बांगलादेशी जलद गोलंदाज मुस्तफिजूर रहमान यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन लढतीत खेळू शकणार नसल्याचे शनिवारी स्पष्ट झाले असून राजस्थान रॉयल्स संघासाठी हा आणखी एक धक्का ठरला आहे. यापूर्वी जोफ्रा आर्चर खेळणार नसल्याने राजस्थानला पहिला धक्का सोसावा लागला होता. रहमान सध्या बांगलादेश संघासमवेत न्यूझीलंड दौऱयावर असून शेवटच्या दोन टी-20 सामन्यात त्याचा सहभाग नव्हता. मात्र, तो रविवारपर्यंत संघासमवेत राहणार असून त्यानंतर भारताकडे रवाना होणार आहे.
दि. 5 एप्रिल रोजी भारतात दाखल झाल्यानंतर त्याला 7 दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण करावे लागेल. यामुळे दि. 12 रोजी पंजाब किंग्सविरुद्ध होणाऱया सामन्यात तसेच त्यापुढील लढतीत तो उपलब्ध नसेल, हे स्पष्ट आहे. राजस्थानची हंगामातील दुसरी लढत दि. 15 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. अर्थात, रहमानचा फॉर्म ही राजस्थानसाठी देखील मुख्य चिंता असणार आहे. यापूर्वी, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशला दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रहमानला संघातील जागाही गमवावी लागली होती. त्याला 3 वनडे व 1 टी-20 सामना खेळण्याची संधी मिळाली. पण, त्यात तो बराच महागडा ठरला. एकमेव टी-20 सामन्यात त्याला 4 षटकात एकही गडी न मिळवता 48 धावा मोजाव्या लागल्या. त्याने 3 वनडे सामन्यातही 3 बळींसाठी 58.33 ची महागडी सरासरी नोंदवली.









