वार्ताहर/ कडोली
कडोली परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने शिवारात पाणीच पाणी झाल्याने भात पिके आणि लागवड केलेले बटाटे बियाणे कुजून जाण्याच्या मार्गावर आहे. येथील गौरी नाल्याचा बांध पूर येऊन ठिकठिकाणी फुटल्याने शेतीचे मोठय़ा प्रामाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
बटाटे लागवडीची कामे आणि भात पेरणी अंतिम टप्प्यात असून मृग नक्षत्रात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कडोली परिसरातील शेतकऱयांची तारांबळ उडाली आहे. नुकतीच पेरणी केलेली भात शेती जलमय झाल्याने भातपिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. माळ शेतवडीत बहुतांश शेतकऱयांनी बटाटे बियाणांची लागवड केलेली आहे. या शेतीत पाण्याचे प्रमाण अधिक होऊन बटाटे बियाणे कुजून जाणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
गौरी नाल्याचे बांध फुटले
गेले दोन-तीन दिवस कडोली परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाल्याने कडोली-देवगिरी रस्त्यावरील गौरी नाल्याला मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. या नाल्याचे ठिकठिकाणी बांध फुटले आहेत. परिणामी नाल्याचे पाणी शिवारात जाऊन शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.









