दिवसभरात पावणेदोन इंच पावसाची नोंद : आजही मुसळधार कोसळण्याची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
गोव्यापासून 270 किमी दूर अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून काल मंगळवारी संपूर्ण गोव्याला झोडपून काढले. पणजीत सकाळी 8.30 ते सायं. 5.30 दरम्यान पावणेदोन इंच पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात सर्वाधिक 2 इंच पाऊस सांखळी केंद्रात नोंदविला गेला. वादळाचा तडाखा थेट गोव्याला बसणार नसला तरी त्याचा प्रचंड प्रभाव गोव्यावर होईल. आज मुसळधार पाऊस गोव्यात पडणार तसेच जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
निसर्ग वादळ मुंबईच्या दिशेने सरकत असून महाराष्ट्राच्या हरिहरेश्वरला आज दुपारी त्याचा बराचसा तडाखा बसणार आहे, तर गोव्यापर्यंत समुद्र किनारी मोठमोठय़ा लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस
निसर्ग चक्रीवादळाने गोव्याला बगल देणे चालू केले आहे. जरी वादळ गोव्यापासून 270 किमी दूर असले तरी देखील या वादळाचा प्रभाव एवढा जोरदार आहे की, गोव्यात सोमवारी काही भागात जोरात तर मंगळवारी दिवसभरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. राज्यातील जनजीवन या मुसळधार पावसाने अस्तव्यस्त झाले. सकाळी सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. दुपारी थोडी विश्रांती घेतली. परंतु दु. 2 वाजता परत तो आक्रमक झाला. सायंकाळी देखील सर्वत्र मुसळधार पावसाने गोव्याला झोडपून काढले. राज्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात मातीयुक्त लालपाणी शिरले. काही भागात रस्त्यावर पाणी आल्याने वाहन चालविणेही अशक्य झाले.
कांपाल रस्ता गेला पाण्याखाली
राजधानी पणजीत कांपाल येथे नेहमीप्रमाणे रस्ता पाण्याखाली गेला. महापौर उदय मडकईकर यांनी अभियंत्यांना घेऊन परिस्थितीची पाहणी केली. साबांखाच्या अभियंत्यांना त्यात लक्ष घालण्याची विनंती केली. पावसाचा जोर सायंकाळी बराच वाढला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार वादळी वाऱयासह मुसळधार पाऊस पडेल. वादळाचा वेग ताशी 60 किमी व त्याही पुढे जाऊ शकतो. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये. राज्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 50 मिमी एवढा पाऊस सांखळी केंद्रात झाला.
आगामी तीन दिवस जोरदार पाऊस
आगामी 3 दिवस गोव्यात जोरदार पाऊस पडेल. वादळाचा प्रभाव हा तसा 3 दिवस राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यातील सर्व समुद्रकिनाऱयांवर लाल बावटा लावण्यात आला आहे. राज्यातील जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.









