कोरड्या नद्या झाल्या प्रवाहित , धरण परिसरातही समाधानकारक पाऊस
विशेष प्रतिनिधी/ पणजी
अखेर जोरदार पाऊस बरसला आणि गोमंतकाची भूमी सुखावली. गेल्या कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी दुपारी सुऊ झालेला पाऊस शनिवारी दिवसभर चालूच राहिला. गोव्यातील काही भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पुढील पाच दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार, असा इशारा देत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला. सांगेमध्ये दिवसभरात चार इंच, फोंड्यात तीन इंच पेक्षा जास्त पाऊस तर सांखळी, म्हापसा येथे जवळपास 3 इंच एवढा समाधानकारक पाऊस पडला. या पावसामुळे अखेर राज्यातील कोरड्या पडलेल्या नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह सुऊ झाला आणि पिण्याच्या पाण्याची समस्या तात्पुरती सुटली आहे.
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये समाधानकारक पाऊस पडला आहे. शुक्रवारपासून सुऊ झालेला पाऊस शनिवारी रात्री उशिरापर्यंत अखंडित चालू होता. शनिवारी सकाळी पावसाला फार जोर नव्हता मात्र बारीक रिपरिप चालू होती. दुपारी सुऊ झालेला पाऊस मात्र रात्री उशिरापर्यंत चालू होता. मान्सून अधिक सक्रिय झालेला आहे आणि पुढील पाच दिवसात तो मुसळधारपणे बरसत राहणार आहे. यामुळे जनतेची पाण्याची गंभीर समस्या सुटल्यात जमा आहे.
प्राप्त माहितीनुसार, सांखळीच्या वाळवंटी नदी परिसरात शुक्रवारपासून सुऊ झालेला पाऊस सातत्याने कोसळत राहिल्याने अखेर नदीच्या पाण्याचा प्रवाह सुऊ झाला. म्हादई नदीमधून देखील पाण्याचा बंद पडलेला प्रवाह सुऊ झाला. धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने गोव्यावर येऊ घातलेले पाण्याचे भीषण संकट तुर्तास टळले.
हवामान खात्याने सायंकाळी गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळणार त्याचबरोबर जोरदार वादळी वारे वाहतील असा इशारा दिलेला आहे. कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.
सांगे, काणकोण, फोंडा मुसळधार पाऊस शेतीकामांना प्रारंभ
दरम्यान, शुक्रवारी सुऊ झालेला पाऊस हा फार उशिराने आला असला तरी तो समाधानकारक ठरला. सांगे, केपे, काणकोण, फोंडा या परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले.









