वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पतियाळातील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये 10 जूनपासून राष्ट्रीय मुष्टियुद्ध फेडरेशनतर्फे टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱया भारतीय मुष्टियोद्धय़ांकरिता प्रशिक्षण सराव शिबिर सुरू करण्यात येणार होते. पण या शिबिराला अधिकृत परवानगी शासनाकडून मिळण्याकरिता आणखी किमान एका आठवडय़ाचा कालावधी असल्याने सदर शिबिर लांबणीवर टाकण्यात आल्याचे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
यापूर्वी भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनतर्फे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱया भारताच्या पुरुष आणि महिला मुष्टियोद्धय़ांकरिता प्रशिक्षण सरावाचे शिबिर आयोजित करण्याकरिता शासनाकडे विनंती करण्यात आली होती. दरम्यान, या योजनेला भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाकडून अद्याप होकार मिळालेला नाही. शासनाकडून या शिबिराला परवानगी लेखी स्वरुपात मिळाल्यानंतरच साईकडून हे शिबिर सुरू करण्याकरिता परवानगी देण्यात येईल, असे फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. साचेटी यांनी सांगितले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी विविध वजन गटात भारताचे नऊ मुष्टियोद्धे पात्र ठरले आहेत. 52 किलो गटात अमित पांगल, 63 किलो गटात मनीष कौशिक, 69 किलो गटात विकास कृष्णन, 75 किलो गटात आशिषकुमार, 91 किलोवरील गटात सतीशकुमार, महिलांच्या विभागात 51 किलो गटात एम. सी. मेरीकॉम, 60 किलो गटात सिमरनजित कौर, 69 किलो गटात बी. लोव्हिलीना, 75 किलो गटात पूजा राणी यांचा समावेश आहे. पतियाळाच्या साई केंद्रामध्ये पुरुष मुष्टियोद्धय़ांना तर दिल्लीत महिला मुष्टियोद्धय़ांसाठी प्रशिक्षण सराव शिबिर घेतले जाईल.









