एका महिन्याचे वेतन पंतप्रधान मदतनिधीला सुपूर्द, नेमबाज मनु भाकरचाही आवर्जून पुढाकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अवघा देश एकवटला असून सहा वेळ वर्ल्ड चॅम्पियन व राज्यसभा खासदार मेरी कोमनेही आपले कर्तव्य पार पाडताना एक महिन्याचा पगार पंतप्रधान सहायता निधीला दिला आहे. मेरीने ट्विटरद्वारे यासंदर्भातली माहिती दिली. तसेच खासदार निधीतून एक कोटींचा निधीही मदतकार्याला सोपवण्याचा निर्णय मेरीने घेतला आहे.
सध्या भारतातही कोरोनाचे हजारहून अधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 25 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यसभेची खासदार असलेल्या मेरीने सामाजिक भान जपत आपला एका महिन्याचा पगार (एक लाख रुपये) पंतप्रधान सहायता निधीकडे सोपवला आहे. कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी सर्वांनी शक्य तितक्या पद्धतीने मदत करावी, असे आवाहनही मेरीने केले आहे. याशिवाय, मणिपूर राज्य सरकारच्या सहायता निधीलाही तिने एक लाख रुपयांचा मदतनिधीला दिला आहे.
नेमबाज भाकरकडून एक लाखाची मदत

चंदीगड :
भारताची आघाडीची नेमबाज मनु भाकरनेही आपले सामाजिक कर्तव्य जपताना हरियाणा सरकारच्या मदतनिधीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिला आहे. सध्य घडीला हरियाणा सरकारकडून कोरोनाग्रस्तांसाठी मोफत उपचार व मोठय़ा प्रमाणात मदत केली जात आहे. आपल्याकडूनही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपये सोपवले असल्याची तिने सांगितले आहे. कोरोनाच्या या महाभयानक संकटातून लवकरच आपली मुक्तता होईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.









