वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारताचा माजी मुष्टियोद्धा डिंको सिंग याला यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्यावर वैद्यकीय इलाज सुरू होता. कोरोनातून आता तो पूर्णपणे बरा झाला असून त्याला इम्फाळमध्ये घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
डिंको सिंगला कर्करोगाची बाधा झाली असून या असाध्य रोगावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. अशा स्थितीमध्ये त्याला कोरोनाची बाधाही झाली. मे च्या शेवटच्या आठवडय़ामध्ये इम्फाळमधील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. त्याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान, त्याला कोरोनातून बरे होण्यासाठी जवळपास महिनाभर रुग्णालयात रहावे लागले होते. कोरोना व्याधीतून तो आता पूर्णपणे बरा झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्वगृही परतल्यानंतर त्याला आता 15 दिवसांच्या कालावधीसाठी विलगीकरण कक्षात रहावे लागणार असून डिंको सिंगने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
डिंको सिंगने 1998 साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. या कामगिरीनंतर शासनातर्फे डिंको सिंगचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. 2013 साली त्याला पद्मश्री किताबही मिळाला होता. कोरोनाच्या व्याधीतून बरे होण्यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या होत्या. भारतीय मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष अजयसिंग, कार्यकारी संचालक आर. के. सचेती तसेच सरचिटणीस जय कोवली यांचे डिंको सिंगने आभार मानले आहेत. 2017 साली डिंको सिंगला कर्करोगाची बाधा झाली असून या व्याधीवर वैद्यकीय इलाज सुरू आहे.









