वृत्तसंस्था/ बेलग्रेड
एआयबीएच्या पुरुषांच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचा मुष्टियोद्धा आकाशकुमारने 54 किलो वजन गटात शेवटच्या सोळा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. त्याचा प्रतिस्पर्धी जर्मनीचा इब्राहिम आजारपणामुळे उपलब्ध न झाल्याने आकाशकुमारला पुढे चाल मिळाली. आता आकाशकुमार आणि प्युर्टोरिकोचा टिराडो यांच्यात लढत होणार आहे.
या स्पर्धेत 60 किलो वजन गटात सहभागी झालेला भारताचा वरिंदर याला ताप आल्याने त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. वरिंदरची कोरोना चाचणी घेण्यात आली पण, या चाचणीत तो निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. गुरुवारी रात्री येथे झालेल्या 67 किलो वजन गटातील लढतीत भारताच्या आकाश संगवानने जर्मनीच्या क्रोटेरवर 4-1 अशा गुणांनी मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये शंभर देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी झाले असून सुवर्णपदक विजेत्याला 1 लाख डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 50 हजार डॉलर्स आणि दोन्ही कास्यपदक विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे.









