वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माँटेनेग्रो येथील बुडवा येथे सुरू असलेल्या 30 व्या ऍड्रियटिक पर्ल आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 12 पदके निश्चित झाली आहेत. दरम्यान, या स्पर्धेत आशियाई युवा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बी. छानू आणि विनका यांनी अनुक्रमे 51 आणि 60 किलो वजनगटात उपांत्यफेरी गाठत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
मणिपूरची बी. छानू ही महिला मुष्टियोद्धी एमसी मेरी कोम अकादमीमध्ये सराव करते. 51 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत छानूने बल्गेरियाच्या जॉर्जिव्हा ब्लेगोव्हेस्टाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. पंचांनी ही लढत पहिल्या फेरीतच थांबवून छानूला विजयी घोषित केले. आता छानूची उपांत्य लढत उझ्बेकच्या केझाकोव्हाशी होणार आहे.
महिलांच्या 60 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या विनकाने उझ्बेकच्या आशुरोव्हाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. विनका आणि फिनलँडची सुवी तुजुला यांच्यात उपांत्य लढत होणार आहे. अन्य वजनगटात भारताच्या अरुंधती चौधरीने 69 किलो वजनगटात फिनलँडच्या तैमीचा 5-0 अशा गुणांनी पराभव करत आपले कास्यपदक निश्चित केले.
पुरुषांच्या विभागात भारताच्या अरम्बम नाओबा सिंगला (52 किलो गट), सुमित (69 किलो गट) आणि विशाल गुप्ता (91 किलो गट) यांना उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. मात्र, 91 किलोवरील वजनगटात भारताच्या जुगनूने उपांत्यफेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जुगनूला प्रतिस्पर्ध्याकडून पुढे चाल मिळाली. महिलांच्या विभागात अरुंधती चौधरीने 69 किलो गटात, नेहाने 54 किलो गटात, सनामाचा छानू थॉकचोमने 75 किलो गटात यांनी अंतिमफेरी गाठण्याच्या स्थितीत आहेत. 81 किलोवरील वजनगटात भारताच्या अलफिया पठाणने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. सुवर्णपदकासाठी तिची लढत माल्डोव्हाच्या दारिया कोझोरेव्हशी होणार आहे. 57 किलो गटात प्रिती, 64 किलो गटात लकी राणा यांनीही उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. 48 किलो गटात गितिका, 75 किलो गटात राज साहिबा यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. पुरुष विभागात 49 किलो गटात प्रियांशू दबास आणि 91 किलोवरील गटात जुगनू यांचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.









