प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसांपूर्वी सांगितले होते की कोणी कितीही काही बोलले, तर यापुढे कोणावर बोलणार नाही. तरीही त्यांच्या स्वभावानुसार ते लगेच बोलले आहेत. पण मी मात्र ठरवलयं, यापुढे त्यांच्याबाबत काही बोलणार नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीद्वारे त्यांचा निषेध केला. पडळकर हे शिव्यांच्या भाषेत आमच्या नेत्यांवर बोलत असतील आणि भाजपकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांचे समर्थन केले जात असेल, तर यापुढे आम्हीही शिव्यांच्या भाषेत बोलू, असा इशारा मुश्रीफ यांनी रविवारी दुपारी दिला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते खरी कॉर्नर येथील बार्बर जेन्टस् पार्लर येथे नाभिक समाजास साहित्य स्वरूपात मदत देण्यात आली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दिलेल्या इशाऱयाबाबत बोलताना पाटील म्हणाले, आम्ही जे बोलतो, ते करतो. पण मंत्री मुश्रीफांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी कोणावरही बोलणार नाही असे जाहीर केले होते. तरीही लगेच ते बोलले आहे. पण मी मात्र यापुढे कोणावरही बोलणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.








