प्रतिनिधी / कोल्हापूर
कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका खरीप कर्ज देत नसून त्यांच्या थकबाकीचे काय? हा प्रश्न मुश्रीफ दुर्लक्षीत करीत आहेत. आपण राज्याचे मंत्री आहोत हे ध्यानात घेऊन याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला आहे.
राज्यातील १४ जिल्हा बँकांनी राज्य सरकारच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करुन थकित व कर्जमाफीस पात्र शेतकऱयांना खरीप कर्जवाटप केलेले नाही. कोल्हापूर जिल्हय़ातील थकित राष्ट्रीयकृत बँकांकडील कर्जदाराची कर्जमाफी प्राप्त न झाल्याने या शेतकऱयांच्या खरीप कर्जाचे काय करणार याचेही उत्तर त्यांनी द्यावे. असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांनी पीक कर्ज उपलब्ध करुन न देण्यामागे सरकारने जाहीर केलेल्या २ लाखाच्या आतील थकीत कर्जदारांची रक्कम त्या बँकांना मिळाली नसल्याने अशा व २ लाखावरील थकीत शेतकऱयांना या बँकांनी कर्जवाटप केलेले नाही. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी रोजी राज्यभर बँकांसमोर आंदोलन भाजपातर्फे केले होते. कोल्हापुरातही अग्रणी बँकेच्या आवारात आंदोलन केले. मात्र मंत्री मुश्रीफ यांना हे आंदोलन दिसून आले नाही.
कोल्हापूर जिल्हा बँकेने खरीप हंगामात १५८ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. तथापि जिह्यातील बरेच शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांकडे पीककर्ज उचल करीत असून त्या बँकांकडे विनाकपात मिळणारी जास्तीची उचल मर्यादा पाहून त्यांचा कल तेथून कर्ज घेण्याचा आहे. असे पत्रकात म्हटले आहे.
खरीप पीककर्ज वाटपाची परिस्थिती चिंताजनकच
राज्यात खरीप पीक कर्जवाटपाची परिस्थिती समाधानकारक नसून जिल्हा बँका व राष्ट्रीयकृत बँका यांना ४५,७८५ कोटी उद्दिष्ट असताना आजपर्यंत केवळ १२,३१५ कोटींचे कर्जवाटप पाहता ३० टक्के उद्दिष्ट पुर्तता झाली आहे. यामध्ये राज्यातील बऱयाच जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने राष्ट्रीयकृत बँकांना ३२,२६१ कोटींचे उद्दिष्ट असताना त्यांनी केवळ ४९०० कोटींचे केलेले कर्जवाटप पाहता १५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राज्यात बहुतांश भागात वेळेवर पाऊस सुरु झाल्याने खरीपाची कामेही वेळेत व वेगात सुरु आहेत मात्र शेतकऱयाची पीककर्ज अभावी कोंडी झाली आहे. यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. याकडेही चंद्रकांतदादांनी पत्रकातून लक्ष वेधले आहे.








