वृत्तसंस्था/ मुंबई
17 ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱया सईद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मुंबईला द्यावे, अशी मागणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य नदीम मेमन यांनी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याकडे केली आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाल्यानंतर बीसीसीआयकडे एमसीएने मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा भरविण्याची मुंबईला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. 2020-21 राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ केला जातो.
कोरोना महामारी संकटामुळे केंद्राने तसेच अनेक राज्य शासनाकडून सांघिक क्रीडा स्पर्धा भरविण्यास परवानगी दिली जात नाही. या समस्येमुळे देशातील संपूर्ण राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक यावेळी रद्द होण्याची शक्यता वर्तविली जाते. 2020 च्या आयपीएल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यासाठी मुंबईला प्राधान्य देण्यात आले होते पण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने भारतीय क्रिकेट मंडळाला आयपीएल स्पर्धा भारतात भरविण्यास केंद्र शासनाकडून परवानगी नाकारण्यात आली. या निर्णयानंतर आयपीएल क्रिकेट स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी घेण्याचा निर्णय निश्चित झाला आणि सदर स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले.
मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मुंबईला देण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीकडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष मेमन यांनी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. मेमन यांच्या सुचनेला भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष आणि भारताचे माजी फलंदाज अशोक मल्होत्रा यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. मर्यादित षटकांची कमी कालावधीतील क्रिकेट स्पर्धा आम्ही भरवू शकतो. सदर स्पर्धा मुंबई, आंध्र, केरळ किंवा बेंगळूर येथे भरविता येईल, असेही मल्होत्रा यांनी म्हटले आहे. कोरोना परिस्थितीमध्ये सध्या पाकिस्तानात राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा भरविल्या जात आहेत. मुंबईमध्ये उत्तम दर्जाचे सहा क्रिकेट स्टेडियम्स उपलब्ध असून या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. क्रिकेटपटू आणि क्रिकेट अधिकाऱयांच्या सुरक्षेबाबत बीसीसीआयच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जाईल, असेही मेमन यांनी म्हटले आहे. मुंबईने यापूर्वी बीसीसीआयची अखिल भारतीय महिलांची वनडे क्रिकेट स्पर्धा 20 दिवसांच्या कालावधीत यशस्वीपणे भरविली, याची आठवण मेमन यांनी बीसीसीआयला करून दिली आहे. 2020 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला 17 ऑक्टाबरपासून प्रारंभ होत असून यासाठी सर्व पूर्वतयारीला प्रारंभ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.









