- महावितरणच्या ‘प्रकाशदूतांची’ कामगिरी
ऑनलाईन टीम / पुणे :
हवेली तालुक्यातील सात गावांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी मुळा-मुठाच्या फुगलेल्या नदीपात्रातील सुमारे ४५० मीटर लांबीच्या ओव्हरहेड वीजवाहिनीची दुरुस्ती करीत पर्यायी व्यवस्थेतून सुरु असलेल्या सात गावांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. २७) पूर्ववत केला.
याबाबत माहिती अशी की, शिंदेवाडी व हिंगणगाव (ता. हवेली) गावामधील मुळा-मुठा नदीच्या पात्रात सुमारे ४५० मीटर लांबीची एक उच्चदाब वीजवाहिनी दि. 24 जुलैला मुसळधार पावसामुळे तुटून नदीमध्ये पडली होती. त्यामुळे कोरेगाव मूळ, भवरापूर, आष्टापूर, टिळेकरवाडी, खामगाव टेक, हिंगणगाव व शिंदेवाडी या गावांतील सुमारे २२५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यातील पाच गावांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुवरठा सुरु करण्यात आला. मात्र हिंगणगाव व शिंदेवाडीमधील सुमारे ६०० ग्राहकांना सिंगल फेजचाच वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकला.
गेल्या तीन-चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस तसेच धरणातून पाणी सोडल्यामुळे मुळा-मुठाच्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने सुरु होता. त्यामुळे वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करता आले नाही. प्रवाहाचा जोर ओसरल्यानंतर मंगळवारी (दि. २७) सकाळी ९.३० वाजता बोटीने नदीपात्रात जाऊन वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने संपूर्ण दिवस प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. त्यानंतर बुधवारी (दि. 28) पुन्हा सकाळी साडेनऊला काम सुरु करण्यात आले.
वीजवाहिनी तळाशी जाऊ नये यासाठी 35 लिटरच्या 25 रिकाम्या प्लॅस्टिक कॅन वीजवाहिनीला बांधण्यात आल्या व वाहिनी बोटीद्वारे पैलतीरावर नेण्यात आली. त्यानंतर दुपारी तीनपर्यंत नवीन ओव्हरहेड वीजवाहिनीचे काम सहकार्याने पूर्ण झाले व सातही गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला.
सध्या मुसळधार पाऊस व पुराच्या आव्हानात्मक परिस्थितीत महावितरणचे अभियंते व जनमित्र ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. मुळा-मुठा नदीच्या पुरामध्ये वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करीत महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला आहे.








