कंग्राळी बुद्रुक येथील मरगाईनगरातील नागरिकांची सतर्कता : आरडाओरड करताच मारुती व्हॅनसह पोबारा, पालकवर्गात भीती
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील मरगाईनगर परिसरात बुधवारी दुपारी 1 वाजता नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुले पळविणाऱया टोळीकडून दोन मुलींची सुटका करण्यात आली. नागरिकांची गर्दी वाढताच मुले पळविणाऱया टोळीने मारुती व्हॅनसह पलायन केले. परंतु या घटनेमुळे कंग्राळी बुद्रुक परिसरात पालकवर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती समजताच काकती पोलीस स्थानकाचे हवालदार शिवानंद, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, बाबू दोडमनी, मयूर बसरीकट्टी, नीता पाटील, दुर्गाप्पा कांबळे, प्रशांत पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन मारुती व्हॅनचा मागोवा घेतला. तसेच ग्रा. पं. कार्यालयावरील सीसीटीव्ही कॅमेऱयातील फुटेज पाहिले असता मारुती व्हॅन शाहूनगरमार्गे आली असणार व शाहूनगर मार्गेच परत गेली असणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
बुधवारी दुपारी 1 वाजता मरगाईनगर स्मशानभूमीकडे जाणाऱया रस्त्यावर पांढरी मारुती व्हॅन थांबली होती. त्याचवेळी रस्त्यावर दोन मुली खेळत होत्या. (वय 7 व 5 वर्षे) दुपारची वेळ असल्यामुळे परिसरातील नागरिकही आपापल्या घरीच होते. मारुती व्हॅनमधून तीन तरुण तेंडावर पूर्ण मास्क घालून चेहरा झाकून त्या दोन्ही मुलींजवळ येऊन त्यांना मारुती व्हॅनमध्ये ओढू लागले. परंतु त्यांच्या तोंडावर कपडा असल्यामुळे मुलींना वेगळा संशय आला.
त्या दोन्ही मुलींनी त्या तरुणांना हिसका देऊन त्यांच्याकडून सोडवणूक करून घेतली. त्यानंतर हातातील दंडुका फेकून त्यांनी सात वर्षांच्या मुलीला मारले. दुसऱया मुलीलासुद्धा ते मारताना दंडुका दगडावर आदळल्यामुळे काही तरी आवाज आल्यामुळे शेजारच्या घरातील एक महिला बाहेर आली. तेव्हा तोंडावर मास्क घातलेल्या या तरुणांबद्दल तिलाही संशय आल्यामुळे तिने आरडाओरड करताच मारुती व्हॅनमधून त्यांनी पोबारा केला. त्यानंतर घाबरलेल्या मुलींना पाणी देऊन त्यांना धीर दिला. शेजारची महिला जर त्या वेळेला बाहेर आली नसती तर मुले पळविणाऱया टोळीने त्या मुलींना पळविले असते.
‘ती’ महिला आली देवदूत बनून
ज्यावेळी दोन्ही मुलींना त्या तरुणांनी मारुती व्हॅनमध्ये घालण्यासाठी ओढून नेत होते तेव्हा मुलींनी हिसका देऊन आपली सुटका करून घेतली. तेव्हा त्यांनी दंडुका फेकल्याने आवाज होऊन शेजारील महिला देवदूत बनून आल्याने मुलींची सुटका झाली, अशी प्रतिक्रिया मुलींच्या वडिलांनी दिली.
पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याने कंग्राळी बुद्रुक गावामध्ये बुधवारी नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन मुलींची सुटका झाली. मात्र तालुक्यातील इतर गावांमध्येही ही टोळी जाऊ शकते. त्यामुळे अनोळखीने मुलांना बोलाविले तरी त्यांनी जाऊ नये. त्यासाठी पालकवर्गाने आपल्या मुलांना याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.









