पुण्याच्या सदाशिव पेठेत वीस वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करण्याची किंवा लग्नाला नकार दिला म्हणून एमपीएससी परीक्षेत तिसरी आलेल्या तरुणीचा राजगडाच्या पायथ्याला खून केल्याच्या घटनांनी महाराष्ट्राचे मन बेचैन झाले आहे. शिक्षण आणि करिअरची संधी मिळालेल्या आपल्या मुली सुरक्षित आहेत का? याची चिंता पालकांना लागली आहे. राज्यकर्ते हे सोडून इतर सगळ्यावर बोलत आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुलींवरील हल्ल्यांच्या घटना वाढलेल्या आहेत. या घटनांपूर्वीच मिरजेत एका गांजा पिणाऱ्या युवकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले आणि गळा चिरून मेली असे समजून टाकून दिले. ती बचावली आणि सत्य उघडकीस आले. आरोपीला पोलीस अटक करू शकले. बोरिवलीच्या श्रद्धा वालकरचा गेल्या वर्षी झालेला खून आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केलेले तुकडे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्यापेक्षा धार्मिकदृष्टीने अधिक पाहिले गेले. कालांतराने हे प्रकरण लोकांच्या विस्मरणात गेले. अलीकडेच एचआयव्हीबाधित पतीने आपल्या पत्नीचा खून करून तुकडे कुत्र्याला खायला घातल्याची घटना उघडकीस आली.
या केवळ विचलित करणाऱ्या घटना नव्हेत तर यामुळे, प्रत्येकजण हादरला आहे. गल्ली कोपऱ्यावर मिळणारा गांजा आणि नशेच्या गोळ्या यामुळे तरुण पिढीला नासवण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी कुख्यात गुन्हेगार आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या आश्रयाने असे व्यवसाय वाढीस लागले आहेत. गाव आणि शहरांतील खुल्या जागांवर रात्रीच्यावेळी आणि महाविद्यालयांच्या मैदानांवर आडोशाला दिवसासुद्धा सर्रासपणे नशा करणारे तरुणांचे टोळके दिसते. नशेमुळे चेव आल्याने कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारीकृत्य करण्यास हे नशाबाज तरुण हयगय करत नाहीत. हाच प्रकार नोकरी, उद्योग नसल्याने बेरोजगार, नोकरी गेल्याने त्रस्त विवाहित नोकरदार, मजूर यांच्यामध्येही दिसतो. लग्न जुळत नसल्याने आणि अन्य विविध कारणांमुळे हताश असणाऱ्या शहरी आणि ग्रामीण युवकांमध्येही अशाप्रकारची हिंसकवृत्ती वाढीस लागल्याचे दिसत आहे.
एनसीआरबीची चिंताजनक माहिती
याबाबत राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोची गतवर्षी ऑगस्टमध्ये जाहीर झालेली आकडेवारी चिंताजनक आहे. आजही त्या स्थितीत सुधारणा नाही. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचे नाव पहिल्या तीन राज्यांमध्ये येते. देशात महिलांवरील अत्याचारांचे एकूण 4 लाख 28 हजार 278 गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात (56,083), त्यानंतर राजस्थान (40,738) आणि तिसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात 39,526 गुन्हे नोंद आहेत. महिलांच्या अपहरणाच्या घटना सर्वाधिक उत्तर प्रदेशात 10,574, बिहार 8,661 आणि 7,559 केसेससह महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. म्हणजे बिहार आणि महाराष्ट्रात हजार घटनांचाच फरक! महिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या गुह्यांत, महाराष्ट्रात सर्वाधिक 927 तर त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. महिलांवरील हल्ले आणि त्यांच्या विनयभंगाचे गुन्हे सर्वाधिक ओडिशामध्ये 14,853 आणि त्यानंतर महाराष्ट्रात 10,658 नोंद होते. बलात्कारांच्या घटनांच्याबाबतीत महाराष्ट्राचा 2496 घटनांसह देशात चौथा क्रमांक लागतो. राजस्थान 6337, मध्य प्रदेश 2947 आणि उत्तर प्रदेश 2845 अशा नोंद घटनांची पहिली तीन राज्ये आहेत. बाललैंगिक अत्याचारांच्या गुह्यांच्या बाबतीतही उत्तर प्रदेशानंतर (6,970) महाराष्ट्रात 6116 इतके दुसऱ्या क्रमांकाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यंदाच्या ऑगस्टमध्ये जेव्हा पुढच्या वर्षाचे विवरण येईल तेव्हा त्यात फारसा बदल नसतील. उलट दुर्दैवाने मुलींच्या खुनाच्या गुह्यांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात येऊ शकते.
शरद पवार यांचा सरकारला सल्ला
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या खात्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
पवार बोलताना म्हणाले की, महिला आणि मुलींवर हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मुली आणि महिलांवर हल्ले वाढले आहेत. 23 जानेवारी ते 23 मे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली बेपत्ता झालेल्या आहेत. पुण्यातून 923 मुली बेपत्ता आहेत. ठाण्यातून 721, मुंबई 738, अशा मिळून 2458 मुली बेपत्ता झालेल्या आहेत. 18 जिह्यात 4 हजार 431 मुली बेपत्ता आहेत. याकडे पवारांनी लक्ष वेधले आहे. याच काळात पवार आणि फडणवीस यांच्यात रंगलेला राजकीय कलगीतुरा महाराष्ट्राने ऐकला. याकडे दुर्लक्ष करुन समाजाच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष देण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर बेखौपपणे गुन्हे घडवत फिरणाऱ्यांना सहज मिळणाऱ्या नशेच्या गोळ्यामुळे समाज चिंतीत आहे.
सदाशिव पेठेतील मुलीला वाचवण्यासाठी लेशपाल जवळगे या स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा बाळगून असलेल्या आणि क्लास करणाऱ्या तरुणाने दाखवलेल्या जिगरबाजपणामुळे आणि त्याच्या मदतीसाठी धावलेल्या दुसऱ्या एका तरुणामुळे महाराष्ट्रातील सगळीच तरुणाई बिघडलेली नाही हे सिध्द होते. क्रीडापटूप्रमाणे या युवकांना कामगिरीच्या जोरावर पोलीस खात्यात थेट घेतले पाहिजे. एक दुर्दैव असे की, हल्ला झालेल्या मुलीची आणि गुन्हेगाराची जात कोणती आहे? याचा शोध समाज माध्यमांवर अनेक लोकांनी याकाळात घेतला आहे. अशी रोगट मानसिकता किती तळात झिरपली आहे हे यातून दिसते. हे महाराष्ट्राचे आणखी एक दुर्दैव!
शिवराज काटकर








