10 कोटींमध्ये खरेदी केला 2 बेडरुमचा फ्लॅट
स्वतःच्या अपत्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रत्येक आईवडिलांचा प्रयत्न असतो. अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये राहणारे मार्क आणि बेथ हंटर यांनी स्वतःच्या दोन्ही मुलींसाठी काहीसे असेच केले आहे. आपल्या मुलींना जग दाखविण्यासाठी या दांपत्याने एका क्रूज जहाजावर एक पूर्ण अपार्टमेंटच बुक केले आहे. याकरता तयंनी 1 दशलक्ष पौंड म्हणजेच 10 कोटी रुपये खर्च केले आहेत.
स्वतःच्या मुलींना एका छोटय़ा नौकेतून पूर्ण जगाची सैर घडवून आणण्याची इच्छा मार्क आणि बेथ हंटर यांची होती. याच इच्छेने मोठे रुप धारण केलयाने त्यांनी अलिकडेच स्टोरीलाइन नॅरेटिव्ह शिपवर एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. या मेगाशिपवर दोन बेडरुम, दोन बाथरुमचे अपार्टमेंट आहे, ज्यात सिनेमा हॉल, स्पा, माइक्रोबूरी, क्लीनिक आणि लायब्रेरी देखील आहे.

तयार होतेय जहाज
चालू वर्षाच्या अखेरीस क्रोएशियामध्ये मोठय़ा प्रमाणावर जहाजाची निर्मिती केली जाईल. ज्यात एकूण 547 अपार्टमेंट असतील आणि हे जहाज 2024 मध्ये समुद्रात उतरणार आहे. जहाज रवाना होईल तेव्हा हंटर यांच्या मुली 14 आणि 16 वर्षांच्या होणार आहेत. दर 1 हजार दिवसांमध्ये पूर्ण जगाला हे जहाज प्रदक्षिणा घालणार आहे.
सर्व सुविधा उपलब्ध
हे जहाज प्रत्येक मोठय़ा बंदरावर अनेक रात्रींसाठी थांबणार आहे. जहाजावर राहणारे लोक जेट स्कीद्वारे समुद्राच्या लाटांचा आनंद देखील घेऊ शकतात. जहाजात 20 डायनिंग आणि बार व्हेन्यू, तीन पूल, एक आर्ट स्टुडिओ, एक बॉलिंग एली आणि रनिंग ट्रक, जिम, योग स्टुडिओ, गोल्फ सिम्युलेटर आणि पिकलबॉल कोर्ट देखील असणार आहे.









