सून अपर्णा यादवांचा भाजपमध्ये प्रवेश : अपर्णा यादवांचे योगींकडून स्वागत
विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी अपर्णा यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले. लखनौ कँट मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने त्या अखिलेश यांच्यावर नाराज होत्या. अपर्णा या मुलायम यादवांचे कनिष्ठ पुत्र प्रतिक यांच्या पत्नी आहेत.
अपर्णा यांनी भाजपप्रवेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे आभार मानले. राष्ट्राच्या आराधनेसाठी निघाली असल्याने सर्वांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. माझ्या पूर्ण क्षमतेने पक्षासाठी योगदान करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अपर्णा यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा मागील तीन दिवसांपासून सुरू होती. मुलायम यांचे बंधू शिवपाल यादवांनी अपर्णाला कुटुंबाच्या पक्षातच राहण्याचा सल्ला दिला होता.
मुलायम यादवांचा हस्तक्षेप
अपर्णा कुठल्याही स्थितीत यावेळची विधानसभा निवडणूक लढवू इच्छित होत्या. याकरता अपर्णा यांनी मुलायम सिंह यादवांकडे पाठपुरावा केला होता. मुलायम यादवांनीही अपर्णाच्या उमेदवारीसाठी अखिलेश यांच्याकडे शब्द टाकला होता. परंतु अखिलेश यांनी उमेदवारी देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

योगींच्या संपर्कात
अपर्णा या सातत्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपर्कात होत्या. मंगळवारी संध्याकाळी शिवपाल यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयात जात अखिलेश यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या कारमध्ये अपर्णा यांचे बंधू अमन विष्ट होते. शिवपाल यांनी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याची विनंती अखिलेश यांच्याकडे केली होती. परंतु अखिलेश यांनी कुटुंबातील कुठल्याही सदस्याला तिकीट देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतरच अपर्णा यांनी भाजप प्रवेशाच्या निर्णयावर मोहोर उमटविली आहे.
लखनो कँट मतदारसंघ
अपर्णा यादव यांनी लखनो कँट मतदारसंघातून उमेदवारी मागितल्याचे समजते. मागील विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अपर्णा या समाजवादी पक्षाच्या उमेदवार होत्या. परंतु त्यांना भाजपच्या रीता बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. अपर्णा यांच्यासाठी अखिलेश यांनीही प्रचार केला होता. पक्षात सामील झाल्याने अपर्णा यांना पुन्हा याच मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
सौम्या भट्ट यांची तयारी
सपच्या युवा नेत्या सौम्या भट्ट याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. सौम्या यांना अखिलेश आणि त्यांच्या पत्नी डिंपल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते.









