ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीच्या लहान मुलांवरील चाचणीसाठी आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात स्क्रिनिंग सुरू झाले आहे.
कोवॅक्सिन लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी घेण्यासाठी भारत बायोटेकने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली होती. 12 मे रोजी ही परवानगी मिळाली. त्यानंतर पटना येथील एम्स रुग्णालयात ही चाचणी सुरू करण्यात आली. दुसऱया आणि तिसऱया टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार देशातील वेगवेगळय़ा केंद्रांवर 2 ते 18 वयोगटातील एकूण 525 मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीपूर्वीची स्क्रिनिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीतील एम्समध्ये या चाचणीसाठी आज स्क्रिनिंगला सुरूवात झाली आहे.
स्क्रिनिंग म्हणजे ज्यांच्यावर लसीची चाचणी करण्यात येणार आहे, ती मुलं निरोगी आहेत का, त्यांची मेडिकल हिस्ट्री तपासणे. तसेच त्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेऊन मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी केली जाते.









