लहान मुलांना विविध पदार्थांचे आकर्षण वाटते आणि ते खातातही. मात्र काही वेळा मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यावर काय उपाय करावा या विचाराने पालक त्रस्त असतात. मुलांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून यावर उपाय करता येईल.
- बटाटय़ाचे सेवन : लहान मुलांना बटाटा आवडत नाही असे काही होत नाही. अर्थात बद्धकोष्ठतेमध्ये तळलेला बटाटा खायला घालू नये. पण उकडलेला, भाजलेला बटाटा मुलांना जरूर खायला द्यावा.
- दलिया आणि भाज्या : दलिया मध्ये तंतूमय घटक भरपूर प्रमाणात असतात. दलिया मुलांसाठी उपयुक्त आहार आहे. दलियामध्ये डाळ, भाज्या मिसळून शिजवून ते मुलांना खायला दिल्यास त्यांना ते आवडेलही आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपयोगी आहे.
- पुरेसे पाणी : मुलांनी योग्य प्रमाणात पाणी पिणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. त्यामुळेच मुलांच्या शरीरात पाण्याचे कमी न होता ते योग्य राहाण्यासाठी अधून मधून मुलांना पाणी जरूर पाजावे.
- दह्याचे सेवन : मुलांना दही आवडतेच. दही एक प्रोबायोटिक फूड आहे, त्यामुळे बद्धकोष्टता होत नाही. दह्यातील पचनयोग्य जीवाणूंमुळे जेवण पचण्यास मदत होते. या जीवाणूंमुळे दह्याला प्रोबायोटिक्स म्हटले जाते.
- डाळींचे सेवन : डाळींमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असतात. तसेच तंतुमय घटकही असतात. त्यामुळेच मुलांनी डाळीचे सेवन करणेही महत्त्वाचे आहे. पचन क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी डाळींची मदत होते. बद्धकोष्ठतेपासून आरामही मिळतो.