लहान मुलांमधला स्थूलपणा वाढत चालला आहे. त्यातच सध्या अनेक ठिकाणच्या शाळाही बंद असल्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. याच कारणामुळे मुलं स्थूल होत चालली आहेत. फसफसणारी शीतपेयं, वेफर्स, बिस्किटं, चॉकलेट्स आणि जंक फूडच्या अतिसेवनामुळे मुलांना होणारा त्रास वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत मुलांमधला स्थूलपणा कमी करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
- सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनच्या म्हणण्यानुसार तीन ते पाच वर्षांच्या मुलांनी दिवसभर शारीरिकदृष्ट्या सक्रीय रहायला हवं तर सहा ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांनी दिवसभरात किमान 60 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. म्हणूनच मुलांना खेळायला,धावायला पाठवा.
- सहा ते बारा या वयोगटातल्या मुलांना दररोज 1600 ते 2200 कॅलरींची आवश्यकता असते. कोरोनाकाळात मुलं घरीच असल्यामुळे त्यांचं खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुलांना भूक लागल्यावर वेफर्स, बिस्किटं देण्यापेक्षा सफरचंद, द्राक्षं, केळं,चणे, शेंगदाणे द्या.
- टीव्ही बघताना किंवा मोबाईलवर गेम खेळताना जास्त खाल्लं जातं. मुलांचा स्क्रीन टाईम दोन तासांपेक्षा अधिक असू नये. मात्र कोरोनाकाळात अशी परिस्थिती राहिलेली नाही. मुलं टीव्ही बघण्यात, मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ घालवतात. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा. तसंच झोपण्याच्या किमान अर्धा तासभर आधीच मोबाईल काढून घ्या.
- तीन ते पाच वर्षांच्या मुलांनी दहा ते 13 तास झोप घ्यायला हवी. सहा ते बारा वर्षांच्या मुलांनी नऊ ते बारा तास आणि 13 ते 18 या वयोगटातल्या मुलांनी आठ ते दहा तास झोप घ्यायला हवी. अपुर्या झोपेमुळेही वजन वाढू शकतं. म्हणूनच मुलं पुरेशी झोप घेत आहेत ना, हे बघायला हवं.









