सध्या शाळा बंद असल्यामुळे मुलांकडे बराच वेळ आहे. शाळा, परीक्षेची धांदल नाही. त्यामुळे सणावाराच्या तयारीत मुलांनाही सहभागी करून घेता येईल. घरी लग्नसोहळा असेल तर त्यातही मुलांचा सहभाग हवाच. या वेळेचा सदुपयोग केल्यास मुलांनाही सणाचं महत्त्व कळेल. घराची स्वच्छता राखणं किती गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात येईल. मुलांना थोडी शिस्त लागेल. सणावाराच्या तयारीत मुलांना कसं सहभागी करून घेता येईल याविषयी…
* सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे फार बाहेर पडता येत नाही. त्यातच लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेणं योग्य नाही. त्यामुळे सामानाची यादी तयार करताना मुलांना सोबत घ्या. तसंच ऑनलाईन शॉपिंग करतानाही मुलं मदत करू शकतात. मुलांनाही मत विचारा. तसंच खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, किंमतीचा अंदाज कसा घ्यायचा हेही त्यांना शिकवता येईल. कोणत्या वस्तू गरजेच्या आहेत, कोणत्या वस्तू नंतर खरेदी करता येतील हेही सांगा. बचतीचं महत्त्व सांगा.
* घरातली साफसफाई करताना मुलांची मदत घ्या. वयानुसार मुलांना कामं सांगा. आपल्या खोलीची स्वच्छता मुलं करू शकतील. तुम्ही त्यांना मदत करा.
* सणाला घरी फराळाचे पदार्थ केले जातात. या कामातही मुलं मदत करू शकतील. तुम्ही बालपणीच्या आठवणीही सांगू शकता. हे पदार्थ कसे करायचे, पदार्थ करण्यामागची परंपरा हे सगळं सांगता येईल. यामुळे मुलांनाही पदार्थ खाण्यात आणि सण साजरे करताना उत्साह वाटेल.
* सणाशी संबंधित गोष्टी मुलांना सांगता येतील. विशिष्ट सण साजरा करण्यामागची संकल्पना त्यांना समजावता येईल. सणाचा आधुनिकतेशी कसं जोडायचं याचे धडे देता येतील.
* घराची सजावट हा मुलांचा सर्वात आवडता प्रांत. मुलं घरीच सजावटीच्या वस्तू तयार करू शकतात. छोटे कंदिल, झिरमोळ्या, माळा घरी बनवता येतील. यामुळे मुलांचा वेळही जाईल आणि छानशी कलाकृतीही तयार होईल.