कोरोनाच्या तिसऱया उद्रेकासंबंधी ‘एम्स’चे स्पष्टीकरण, ब्लॅक फंगसवरही दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा तिसरा उद्रेक बालकांसाठी धोकादायक ठरणार आहे का, यासंबंधी भारतीय आरोग्य संस्थेने (एम्स) दिलासादायक स्पष्टीकरण दिले आहे. तिसरा संभाव्य उद्रेक मुलांसाठी अधिक त्रासदायक असेल याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे विनाकारण भ्रम पसरवू नये, असे आवाहन या संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी केले. इतरही महत्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया उद्रेकाचा परिणाम लहान मुलांवर बऱयाच कमी प्रमाणात झाला. काही तज्ञांच्या मते तिसऱया उदेकात लहान मुलांना अधिक त्रास होऊ शकतो. तथापि, आतापर्यंत तसे कोणतेही लक्षण दिसून आलेले नाही. त्यामुळे समाजात घबराट पसरविली जाऊ नये. मुलांचे लसीकरण मोठय़ा प्रमाणात केले गेलेले नाही. त्यामुळे ती तिसऱया उद्रेकात अधिक प्रमाणात प्रभावित होऊ शकतात, असा तर्क मांडला जातो. तथापि तो अनाठायी असून त्याचे कोणतेही प्रमाण मिळालेले नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
मुले सुरक्षित राहण्याचे कारण
मानवी पेशींच्या ‘एस रिसेप्टर’ या भागाशी कोरोनाचा विषाणू स्वतःला जोडून घेतो. त्यायोगे तो मानवी पेशीत प्रवेश करतो. तथापि, मुलांच्या पेशींमध्ये हा एस रिसेप्टर कमी प्रमाणात असतो. त्यामुळे कोरोना विषाणू मुलांच्या पेशींवर फारसा परिणाम करू शकत नाही. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे त्यांचे संरक्षण होते. यासंबंधात अधिक संशोधन सुरू आहे, ही बाब डॉ. गुलेरिया यांनी निदर्शनास आणली.
ब्लॅक फंगसची लक्षणे
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ब्लॅक फंगस या रोगावरही महत्वाची माहिती दिली. डोके दुखणे, एका डोळय़ाला किंवा दोन्ही डोळय़ांना सूज, एका बाजूचा चेहरा सुन्न होणे ही ब्लॅक फंगसच्या प्रारंभाची प्रमुख लक्षणे आहेत. ती दिसू लागताच त्वरित उपचार केल्यास लाभ होऊ शकतो. त्यामुळे घाबरून न जाता लवकरात लवकर उपाय करणे आवश्यक आहे, ही बाब त्यांनी आवर्जून नमूद केली.
अनेक नावांमुळे गोंधळ
ब्लॅक फंगस हा मधुमेही कोरोना रुग्णांमध्ये किंवा स्टेरॉईड घेणाऱया कोरोना रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. फंगस (बुरशी) अनेक प्रकारचे असतात. एकाच प्रकारच्या फंगसला ब्ल्Ÿढ, व्हाई, यलो अशी विविध नावे दिल्याने लोकांचा गोंधळ वाढत आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी या फंगसला रंगावरून वेगवेळी नावे देणे थांबविण्याची आवश्यकता आहे, असे महत्वाचे प्रतिपादन त्यांनी केले.
ब्लॅक फंगस संदर्भातही दिलासा
सध्या कोरोनापेक्षाही अधिक भीती ब्लॅक फंगस या विकारासंबंधी निर्माण झाली आहे. कोरोना झाल्यानंतर माणसाठी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. या स्थितीत त्याला ब्लॅक फंगसची बाधा होऊ शकते. कोरोनातून बरे होण्यासाठी स्टेरॉईडयुक्त औषधांचा उपयोग अशास्त्रीय पद्धतीने आणि डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय केल्यास ब्लॅक फंगसचा धोका वाढतो. तसेच ज्यांचा मधुमेह (डायबेटिस) अनियंत्रित आहे, अशा कोरोना रुग्णांनाही हा रोग होऊ शकतो. तथापि, त्याचा प्रसार एका माणसाकडून दुसऱया माणसाकडे होत नाही. हा रोग एका कोरोनाप्रमाणे नाही, असेही दिलासायुक्त विधान डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले.
घाबरू नका, दक्षता बाळगा
ड घाबरून जाणे किंवा गैरसमजांचा बळी ठरणे अतिशय अयोग्य
ड कोरोना किंवा ब्लॅक फंगस यावर तातडीने उपचार हाच उपाय
ड ब्लॅक फंगस एका माणसाकडून दुसऱया माणसाकडे पसरत नाही









