ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रमाचे आयोजन : बालविवाह केल्यास 2 वर्षे सक्तमजुरीसह 1 लाख दंडाची शिक्षा
प्रतिनिधी / येळ्ळूर
मुलांचे हक्क आणि त्यांचे संरक्षण या कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी येळ्ळूरमधील ग्राम पंचायतमध्ये नुकताच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश पाटील उपस्थित होते.
मुलांना उच्च शिक्षण देणे याचबरोबर बालविवाह करू नये, बालविवाह केल्यानंतर कशाप्रकारे शिक्षा व दंड होतो याची माहिती देण्यात आली. मुलांवर आई-वडिलांचे विशेष लक्ष असणे गरजेचे आहे. मुलांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी कायदा करण्यात आला असून मुलांना त्रास होत असल्यास 1098 या सहाय्यवाणी केंद्राशी संपर्क साधावा, असे यावेळी सांगण्यात आले.
बालविवाह केल्यास दोन वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंड अशा कठोर शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. तेंव्हा बालविवाह रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्या मुलाचा विवाह करताना त्याच्या वयाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
प्रारंभी मल्लेश कुंदरगी यांनी स्वागत केले. भारती वाळवेकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला एफ. एस. पाटील, अंगणवाडी निरीक्षिका पार्वती होनकड, ग्रा. पं. कार्यदर्शी एस. आर. मराठे, चांगळेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत, ए. एम. पाटील, अवचारहट्टी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. पी. कानशिडे, शिवालय विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, मराठी मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापिका एस. आर. निलजकर, वाडी शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. पाटील यांच्यासह बी. बी. पाटील, आर. एन. मनियार, एस. यु. रोट्टी, ए. वाय. मेणसे, एस. बी. पाखरे यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.









