प्रतिनिधी /बेंगळूर
चित्रदुर्गच्या मुरुघामठाचे मठाधीश डॉ. शिवमूर्ती स्वामीजी यांना गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. मुरुघा मठातर्फे चालविण्यात येणाऱया वसतिगृहातील दोन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. स्वामीजींना अज्ञात स्थळी नेऊन चौकशी केली जात आहे.
मठाच्या वसतिगृहातील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी स्वामीजींसह पाच जणांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. 26 ऑगस्ट रोजी या विद्यार्थिनींनी म्हैसूरच्या नजाराबाद पोलिसांत तक्रार दाखल केली होती. एफआयआर दाखल झाल्यानंतर 7 दिवसांनी स्वामीजींना अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी रात्री 7ः45 वाजता मुरुघा मठात स्वामीजींची चौकशी केली. अटकेच्या कारवाईमुळे खळबळ माजली असून चित्रदुर्ग शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसऱया आरोपी रश्मी यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. रश्मी या वसतिगृहाच्या वॉर्डन असून स्वामीजींना गुन्हय़ासाठी सहकार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
लैंगिक शोषणप्रकरणी डॉ. शिवमूर्ती स्वामीजींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानेही स्वामीजींविरोधात सुमोटो तक्रार दाखल केली होती. तसेच चित्रदुर्ग जिल्हा पोलीस प्रमुखांना नोटीस बजावून 7 दिवसांत कारवाईसंबंधीचा अहवाल सादर करण्याची सूचना आयोगाने केली होती.
यापूर्वी स्वामीजींनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. गुरुवारी न्यायालयाने सुनावणी एक दिवस पुढे ढकलली. त्यामुळे शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, गुरुवारी रात्रीच डॉ. शिवमूर्ती स्वामीजींना अटक झाली आहे. त्यामुळे स्वामीजींच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर पुढील सुनावणी करण्याचा प्रश्नच येणार नाही.









