राज्य शासनाकडून गोकुळ संचालकपदी नियुक्ती
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेनेच्या स्थापनेपासून एक कार्यकर्ता ते जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले मुरलीधर रघुनाथ जाधव (हुपरी, ता. हातकणंगले) यांना अखेर निष्ठेचे फळ मिळाले आहे. जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या संचालक मंडळावर शासन नियुक्त संचालक म्हणून राज्य शासनाने जाधव यांची नियुक्ती केली आहे.
राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागने मंगळवारी पाठविलेल्या एका आदेशाद्वारे ही नियुक्ती केली आहे. दरम्यान जाधव यांच्या निवडीने गोकुळ मध्ये शिवसेना संचालकांची संख्या सात झाली आहे. तर सत्तारुढ गटाकडून स्वीकृत म्हणून घ्यावयाच्या दोन संचालकपदावरती कोणाची वर्णी लागणार ? इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जाधव यांच्याकडे शिवसेनेचे एक निष्ठावान म्हणून पाहिले जाते. एक कार्यकर्ता, तालुका प्रमुख, शहर प्रमुख ते जिल्हा प्रमुख (ग्रामिण) अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळत शिवसेनेचा भगवा कायम फडकवत ठेवला आहे. विधानसभेच्या इचलकरंजी मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार म्हणून एकवेळ निवडणूक लढवली आहे.
गोकुळवरती शासन नियुक्त संचालक होण्यासाइी इच्छुकांची मोठी संख्या होती. दोन्ही काँग्रेससह शिवसेनेच्या अनेकांनी वरिष्ठपातळीवरुन फिल्डींग लावली होती. परंतू शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत: जाधव यांच्या नावाला पसंती देवून शासन नियुक्त संचालक नियुक्त केले आहे.
शिवसेनेचे सात संचालक
नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. तर आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडून प्रत्येकी दोन संचालक तर विरोधी आघाडीतून निवडून आलेले अमरिषसिंह घाटगे यांच्यासह संचालक मंडळात सेनेचे सहा संचालक होते. तर शासन नियुक्त संचालक म्हणून निवड झालेल्या जाधव यांच्यामुळे ही संख्या सातवर गेली आहे.









