वार्ताहर / मुरगूड
येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयाचे ग्रंथपाल अमर अरुण पाटील (वय ३६) यांचे विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अपघाती निधन झाले. विविध सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणार्या आणि मोठा मित्रपरिवार असलेल्या अमर पाटील यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनेची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली असून सोमवारी रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या हुतात्मा तुकाराम वाचनालय या शासनमान्य ‘अ’वर्ग ग्रंथालयात मयत अमर पाटील ग्रंथपाल म्हणून सेवेत होते. कार्यालयीन कामकाज आटोपून जांभूळखोरा परिसरात असलेल्या आपल्या घरी गेल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास जनावरांना पाणी देण्यासाठी विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करत असताना त्यांना जोराचा धक्का बसला. बेशुद्धावस्थेत परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. घटनेची वर्दी अमोल पाटील यांनी दिली. पोलीस पंचनाम्या नंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून शहरात त्यांना ओळखले जात होते. पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.