दै. तरुण भारतच्या वृत्ताची दखल घेत नगरपालिकेने भाजीपाला विक्रीची बस स्टँडवर व्यवस्था केल्यामुळे ग्राहकांची ओसरलेली गर्दी
मुरगूड / प्रतिनिधी
मुरगुडमधील एकाच कुटुंबातील पती-पत्नी व लहान मुलगी अशा तिघांना तसेच बेळगाव येथून आलेल्या एका महिलेला स्वॅब तपासणीसाठी कागलला पाठवल्यामुळे दुपारपासून शहरात खळबळ उडाली.
शहराच्या एका उपनगरात राहणाऱ्या या कुटूंबातील २५ वर्षाचा मुलगा गेली दोन दिवस निपाणीत (कर्नाटक ) राहिला होता. मुरगूडात आल्यानंतर दोन दिवसापासून तो तापाने फणफणला होता. आज त्याला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोणाच्या पाश्र्वभूमीवर त्याच्यासह संपर्कातील पत्नी व मुलगी ह्यांनादेखील वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी तारळकर यांनी तपासणी करून त्यांना स्वॅब तपासणीसाठी पाठवून दिले. बेळगाववरून शहरात आलेल्या आणखी एका महिलेलादेखील स्वॅब तपासणीसाठी पाठवल्याची माहिती उशीरा मिळाली. दरम्यान आज पुण्यावरून आलेल्या एकाला आणि सातारावरून आलेल्या चौघांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
मुरगूड हे परिसरातील सुमारे 50 गावांचे मध्यवर्ती केंद्र असून गेली तीन -चार दिवस सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू झाल्यामुळे मुरगूड शहरात प्रचंड गर्दी वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून संचारबंदी काळात सर्वच वेळी फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. शहरात प्रवेश होत असलेल्या सातही ठिकाणावरून उभारलेले अडथळे काढण्यात आल्यामुळे तसेच या ठिकाणी कोणतेही नियंत्रणाचे माध्यम ठेवले नसल्यामुळे शहरात ‘आओ जाओ घर तुम्हारा ! ‘ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत नगरपालिका, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या सर्वांनीच गांभीर्याने दखल घेत योग्य ती वेळीच खबरदारी न घेतल्यास कोरोणाचा शिरकाव आणखीन वेगाने वाढू शकेल. अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुरगूड शहरातून एकाच कुटूंबातील तिघांसह चौघांना स्वॅब तपासणीसाठी पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दै. तरुण भारतच्या वृत्ताची दखल : भाजीपाला विक्री बस स्टँडवर!
‘शिथीलतेनंतर मुरगूड शहरात प्रचंड गर्दी !’ या शीर्षकाखाली दै. तरुण भारतने ठळक वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध केले. याची दखल घेत मुरगूड नगरपालिकेने बाजारपेठेमध्ये भाजीपाला विक्री मुळे होत असलेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बसस्थानकावर भाजीपाला विक्री करण्याची व्यवस्था केली आहे.
Previous Article‘क्राईम पेट्रोल’ मधील लोकप्रिय अभिनेते शफीक अन्सारी यांचे निधन
Next Article वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग, आढळले नवे 6 रुग्ण








