प्रतिनिधी /वास्को
मुरगाव बंदरातील ‘कंटेनर लाईन फिडर सेवा’ बंद करण्याच्या हालचालींबाबत गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या लॉजिस्टिक समितीने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष चंद्रकात गावस यांनी समितीच्या शिष्टमंडळासमवेत नुकतीच एमपीटीच्या अध्यक्षांची भेट घेऊन त्यांनी ही सेवा बंद करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन त्यांना दिले आहे.
मुरगांव बंदरात 1992 सालापासून ‘कंटेनर लाईन फिडर सेवा’ सुरू करण्यात आली होती. मात्र ही सेवा आता बंद करण्याच्या हालचाली गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्टीजच्या लॉजिस्टिक समितीच्या नजरेस आल्याने असा निर्णय घेऊ नये अशी मागणी समितीने केली आहे. ही सेवा बंद केल्यास स्थानिक उद्योगावर परीणाम होणार आहे. कंटेनर सेवा येत्या 3 ऑगष्टपासून बंद करण्याचा निर्णय एमपीटीने घेतलेला असल्याचे समितीने म्हटले असून हा निर्णय एमपीटी मागे घेईल अशी अपेक्षा चंद्रकांत गावस यांनी व्यक्त केली आहे. शिष्टमंडळाने एमपीटीचे प्रभारी अध्यक्ष राजीव जलोटा यांना यासंबंधी निवेदन दिलेले असून या निवेदनाची प्रत केंद्रीय जहाजोद्योग श्रीपाद नाईक यांनाही पाठवण्यात आलेली आहे.
लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गवस यांच्यासह सहअध्यक्ष धिरेंद्र ठक्कर, सदस्य संतोष परब, सुधीर मणेरकर, मयुर नेगांधी यांचा एमपीटीच्या अध्यक्षांना भेटलेल्या शिष्टमंडळात समावेश होता.









