प्रतिनिधी / वास्को
मुरगाव तालुक्यात वाढत्या संख्येने आढळून येणाऱया कोरोना बाधितांसाठी चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटल पाठोपाठ कासांवलीचे हॉस्पिटल तसेच हेडलॅण्ड सडय़ावरील एमपीटीचे हॉस्पिटलही खुले करण्यत आल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे. मुरगावमध्ये कोविड रूग्णांसाठी गेल्या काही दिवसांपासून ही तिन्ही हॉस्पिटल्स कार्यरत झालेली आहेत.
मागच्या वर्षी जेव्हा वास्कोत कोरोनाचा उद्रेक झाला होता, तेव्हा हेडलॅण्ड सडय़ावरील एमपीटीच्या हॉस्पिटलची निवड कोरोना सेवा केंद्र म्हणून केली होती. या सुविधेचा चांगला उपयोग काही महिने झाला होता. यंदा मुरगाव तालुक्यात दिवसा शेकडो रूग्ण आढळून येत असतानाही सेवा केंद्र किंवा हॉस्पिटलची सोय करण्यात आली नव्हती. मात्र, सोमवारी चिखलीचे उपजिल्हा हॉस्पिटल कोविड उपचारांसाठी उपलब्ध करण्यात आले. सौम्य लक्षणे असलेले अनेक कोरोना बाधीत या हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत. कासांवलीचे हॉस्पिटलही कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. या ठिकाणीही रूग्ण दाखल होऊ लागले आहेत. हेडलॅण्ड सडय़ावरील एमपीटीचे हॉस्पिटल मात्र केवळ कोविड सेवा केंद्र म्हणून पुन्हा वापरण्यात येत आहे. एमपीटीच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलातील डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचाऱयांना कोविड केअर सेंटरसाठी राज्य प्रशासनाकडे सोपविण्यात आले आहे. तालुक्यात आता तीन ठिकाणी कोविड रूग्णांसाठी आवश्यक अशी शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने रूग्णांना व त्यांच्या कुटुंबियांनाही दिलासा मिळाला आहे.
वास्को शहरातील व्यवहार बंदच
दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वास्को शहरात जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होता. मात्र, शहरात वाहनांची व लोकांची वर्दळ होती. मोजक्याच प्रवासी बसगाडय़ा फेऱया मारीत होत्या. मुरगाव तालुक्यातील पंचायती तसेच काही पालिका प्रभागांतही काल गुरूवारी व्यवहार बंद होते. मात्र, सर्व जीवनाश्यक सेवा उपलब्ध असल्याने या बंदचा दैनंदिन जीवनावर अद्याप परीणाम झालेला नाही.
तालुक्यात 3253 कोरोना बाधितांची नोंद
दरम्यान, मुरगाव तालुक्यातील रूग्ण संख्या गुरूवार संध्याकाळपर्यंत 3253 ऐवढी होती. वास्को आरोग्य केंद्रात 861 रूग्णांची नोंद झालेली असून कुठ्ठाळीतील आरोग्य केंद्रात 1309 रूग्णांची नोंद झालेली आहे तर कासांवली प्राथमीक आरोग्य केंद्रात 1083 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी तालुक्यातील रूग्णंची संख्या 3360 होती.
कोरोनामुळे पालिका मंडळ स्थापनेची बैठक रद्द
मुरगाव पालिका मंडळाच्या स्थापनेसाठी पालिका प्रशासकीय संचालकांनी सोमवारी दि. 10 रोजी सकाळी 11 वा. वास्कोतील जनता वाचनालयात बैठक बोलावली होती. मात्र, या पालिकेतील दोन नगरसेवक कोरोना पॉझिटीव्ह असल्याने ही बैठक काही काळासाठी रद्द करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुक प्रचारात व्यस्त राहिलेल्या अनेकांना सध्या कोरोना बाधीत झाल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे किंवा घरी कॉरन्टाईन होणे भाग पडलेले आहे. यात आजी माजी नगरसेवक तसेच निवडणुकीतील उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. निवडणुक प्रचारा दरम्यानही काही उमेदवार कोविड बाधीत झाले होते. माजी नगराध्यक्ष सुमिता उसगावकर अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या पतीचे काही दिवसापूर्वी गोमेकॉमध्ये कोविडमुळेच निधन झाले होते. निवडणुकीनंतर कोरोनाचा अनेकांना त्रास झालेला आहे. नगरसेविका श्रध्दा आमोणकर कोविड बाधीत आढळून आल्यानंतर आता त्यांचे पती व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकरही कोविड बाधीत आढळून आलेले असून ते घरीच कॉरन्टाईन आहेत. नगरसेवक यतीन कामुर्लेकर हे गेल्या काही दिवसांपासून चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.
या पाश्वभूमीवर पालिका प्रशासकीय संचालक गुरूदास पिळर्णकर यांनी धोका पत्करणे टाळले आहे. दोन नगरसेवक कोरोना बाधीत असल्याने त्यांनी सोमवारी होणारी पालिका बैठक काही काळासाठी रद्द केली आहे. या बैठकीत मुरगावचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड होऊन पालिका मंडळ आपल्या कार्याला लागणार होते. पालिका मंडळाच्या बैठकीची पुढील तारीख मुरगांव पालिका प्रशासकांनी बैठक घेण्याबाबत सकारात्मक अहवाल सादर केल्यानंतरच नव्याने जाहीर करण्यात येणार आहे.









