निवडणूक आयोगाच्या बैठकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्डचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
मुरगाव तालुक्यातील विरोधी पक्षीय मतदारांची नावे मतदार यादीतून गाळण्याचे षडयंत्र रचण्यात आले असून त्या कामासाठी तेथे 29 बीएलओंपैकी 21 बीएलओ हे वीज खात्यातील कर्मचारी असल्याचे गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आणि यासंबंधी कारवाई करण्याची मागणी केली. मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल गोयल यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
मतदार यादी दुरुस्ती या करिता आयोगाच्या गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. काल मंगळवारी झालेल्या या बैठकीला काँग्रेस, भाजप व गोवा फॉरवर्ड या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इतर पक्षांनी प्रतिसाद दिला नाही.
मुरगावातील बीएलओमध्ये वीज कर्मचारीच अधिक
कोणत्याही तालुक्यातील बीएलओ हे विविध खात्यातील असायला हवेत. ते एकाच खात्यातील असता कामा नयेत, असा नियम आहे. परंतु मुरगाव तालुक्यात मात्र तो नियम गुंडाळून ठेवण्यात आला असून तेथील आमदार मिलिंद नाईक हे वीजमंत्री असताना त्यांनी हे 21 बीएलओ फक्त वीज खात्यातील नेमले आणि अनेक विरोधी मतदारांची नावे यादीतून कमी करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला आणि तसे आयोगाच्या निदर्शनास आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फोंडा, मुरगाव व इतर मतदारसंघातील नावे कमी करण्याचे प्रकार घडत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मृत माणसांच्या नावे मतदार गाळण्याचे प्रस्ताव येत असल्याचा प्रकार मुरगावात घडल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसे मृत्यू प्रमाणपत्रही आयोगासमोर सादर केले आहेत. भाजपतर्फे केशव प्रभु व काँग्रेसतर्फे आल्तिनो गोम्स उपस्थित होते.









