विरोधी उमेदवार व कार्यकर्त्यांची सतावणूक : संकल्प आमोणकर यांचा आरोप
प्रतिनिधी / वास्को
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच मुरगाव वॉरीयर्सचे नेते संकल्प आमोणकर यांनी मुरगावात पालिका निवडणुकीत विरोधकांची सतावणुक करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप केला आहे. मुरगाव वॉरीयर्सचे उमेदवार जिंकणार या भितीने नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याचीच ही लक्षणे असून आपल्या उमेदवारांच्या सतावणुकीचा आपण निषेध करीत असल्याचे संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यावेळी मुरगाव वॉरीयर्सचे उमेदवार शरद चोपडेकर, शेखर खडपकर, उदय नाईक तसेच समाजसेवक शंकर पोळजी उपस्थित होते. मुरगावात आपल्या पॅनलच्या उमेदवारांना भरीव प्रतिसाद मिळत असून याचा धसका मंत्री मिलिंद नाईक यांनी घेतला आहे. त्यामुळे आपले उमेदवारच नव्हे तर कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारांनाही सतावणुकीला सामोरे जावे लागत आहे. आपल्या उमेदवार व कार्यकर्त्यांविरूध्द शासकीय यंत्रणेचा वापर होऊ लागला आहे. भिती दाखवणे, धमकावणे असेही प्रकार सुरू आहेत. उमेदवारांवर खोटय़ा तक्रारीही लादण्यात येत असून त्यांना अशा तक्रारींमध्ये गुंतवून व प्रचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून झाल्याचा आरोप संकल्प आमोणकर यांनी केला. प्रभाग 1 पासून प्रभाग 9 पर्यंतच्या आपल्या उमेदवारांवर खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. शेखर खडपकर, निलेश नावेलकर, श्रध्दा आमोणकर तसेच शरद चोपडेकर यांना अशा तक्रारींचा फारस मनस्ताप सहन करावा लागला आहे. विरोधकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन शासकीय यंत्रणेने आपल्या उमेदवारांविरूध्द कारवाईसाठी पावले उचलली. मात्र, आम्ही सत्तेचे पाठबळ असलेल्या उमेदवारांविरूध्द केलेल्या तक्रारींची यंत्रणेने कोणतीच दखल घेतली नाही अशी तक्रार आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
मुरगावात सत्ताधारी उमेदवारांना कितीही बॅनर लावायला मिळतात तर विरोधकांचे बॅनर काढले जातात. विरोधी उमेदवारांच्या मागे गेले काही दिवस सतत पोलिसांचा पिच्छा असतो. आपल्या कार्यालयाबाहेरही पोलीस ठेवण्यात आलेले आहेत. आमच्या उमेदवार व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आलेली आहे असा आरोप आमोणकर यांनी केला. आतापर्यंत सडा आणि बायणा भागातील जवळपास 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलीस स्थानक हजर होण्यास भाग पाडून त्यांना ताटकळत ठेवलेले आहे. असा प्रकार मुरगावात प्रथमच घडत असून पालिका निवडणुकीत अपयश येण्याच्या भितीनेच हा खटाटोप सुरू झालेला आहे. कोपरा सभांच्या वेळीही पाच पोलीस जीप्स येऊन दाखल होतात. त्यामुळे सभेला उपस्थित लोक पोलिसांच्या भितीने पळून जातात अशा प्रकारची भिती सत्तेचा वापर करून पसरवीण्यात आलेली असून आपण अशा राजकारणाचा निषेध करीत असल्याचे संकल्प आमोणकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष शरद चोपडेकर तसेच शेखर खडपकर यांनीही आपल्यावर व एकूण मुरगाव वॉरीयर्सच्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांविरूध्द झालेल्या सुडबुध्दीच्या राजकारणाची माहिती देऊन मंत्री मिलिंद नाईक यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली.









