साडेतीन लाखाचे नुकसान
वार्ताहर / बाळेकुंद्री
नेसरगी गावाजवळ असलेल्या मुरकीभावी शिवारात घातलेल्या सोयाबीनच्या गंजीवर वीज पडून लागलेल्या आगीत सुमारे साडेतीन लाखाहून अधिक सोयाबीन आगीत भस्मसात झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने शेतकरी व जनावरे बचावली. गावातील शेतकरी सुरेश सिद्दाप्पा वडेयर यांनी नुकतेच आपल्या सात एकरातील सोयाबीन पीक काढून ती एका ठिकाणी जमा करून त्याची गंजी लावली होती. बुधवारी दुपारी या भागात तुरळक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. पावसापेक्षा विजेची चकमक व गडगडाट जास्त असल्याने नेमक्या याचवेळी वीज वडेयर यांच्या सोयाबीन गंजीवर पडल्याने गंजीने एकदमच पेट घेतली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने कांही क्षणातच आगीने घेरले. व संपूर्ण सोयाबीनची गंजी आगीत भस्मसात झाली. या घटनेची माहिती कळताच बैलहोंगल येथील अग्निशमन दलाची पाण्याची गाडी हजर होऊन आग आटोक्यात आणली. या आगीत साडेतीन लाखाहून अधिक सोयाबीन जळून नुकसान झाल्याने वडेयर कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले आहे. नेसरगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.









