कोरोनाने आपल्याला त्रास दिला आणि अजून देतोय. पण त्याने भाषेला एक नवीन शब्द देखील दिला हे कबूल करायला पाहिजे. आम्ही नोकरीत असताना पर्सोनेलच्या पेपरच्या अभ्यासात कर्मचाऱयांना मिळणाऱया रजांचे प्रकार दिलेले होते. कॅजुअल लीव्ह, प्रिव्हिलेज लीव्ह, सिक लीव्ह, मॅटर्निटी लीव्ह आणि क्वारंटिन लीव्ह. तेव्हा त्यांची माहिती तोंडपाठ केली होती. क्वारंटिन रजेशी किंवा त्या शब्दाशी कधी संबंध आला नाही. तो शब्द कोरोनामुळे अचानक समोर आला.
कोरोनाने दुसरा शब्द दिला तो लॉकडाऊन. त्यापूर्वी गुंडांना लॉकअपमध्ये ठेवतात असे ऐकून वाचून होतो. सभ्य लोकांना गुंड व्हायरसपासून बचावासाठी लॉकडाऊनमध्ये रहावे लागते ही नवीन माहिती कळाली. लॉकडाऊन आला तेव्हा तो पंधरा दिवसांसाठी, मग वाढत गेला. विद्यार्थी, मध्यमवर्गीय नोकरदार, पेन्शनर घरी अडकून बसले.
आयुष्य केव्हातरी सुरळीत होईल. लोकांना नोकऱया पुन्हा मिळतील. अर्थचक्राला गती येईल अशी आपण आशा करू. हे सगळे होईल तेव्हा जुने दिवस आठवून कदाचित हसू येईल. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी भीतीपोटी घरात जादा किराणा माल भरून ठेवला असेल त्यांच्या घरातली लहान मुले बाकीचे खेळ खेळून कंटाळल्यावर दुकान दुकान खेळली असतील. लॉकडाऊनमुळे प्रियकराला चोरून भेटून आजारी पडल्यावर एखादी मुन्नी क्वारंटिन झाली असेल. मुन्नी क्वारंटिन हो गयी, डार्लिंग तेरे लिए.
एखाद्या नेत्याचे चरित्र असेही लिहिता येईल. मुख्यमंत्री व्हायचे म्हणून त्यांनी पक्षांतर केले. नव्या पक्षाने त्यांना एका छोटय़ा पदावरच पाच दहा वर्षे क्वारंटिन करून ठेवले. एका निवडणुकीत अमुक पक्ष सत्तेवर येईल अशा आशेने अनेक आमदारांनी त्या पक्षात मेगाप्रवेश केला. पण निवडणुकीत ते सगळे उमेदवार पडले आणि भलताच पक्ष सत्तेवर आला. आता सगळे गयाराम ‘माजी आमदार’ या पदावर पाच वर्षांसाठी क्वारंटिन झाले.
गोरगरिबांच्या क्वारंटिन होण्यात मौज नसते. एनआरआय लोक विदेशातून येऊन उंची हॉटेलात क्वारंटिन होतात, कोरोनाचा संसर्ग झालेले मोठे पुढारी आपला मतदारसंघ सोडून (कारण तिथे त्यांनी उत्तम आरोग्य सेवेसाठी काही काम केलेले नसते) मोठय़ा शहरात येऊन उपचार घेतात आणि हायफाय क्वारंटिन होतात.
पूर्वी पुढारी टोपीवर ‘मैं भी अमुक’ असे लिहायचे. आता त्यांनी मास्कवर ‘मैं भी क्वारंटिन’ लिहिलेले केव्हा दिसेल त्याची वाट बघतोय.








