खरेदी विकीसह विविध व्यवहार ठप्प, संपाला सांगलीत प्रतिसाद
प्रतिनिधी/ सांगली
रखडलेल्या पदोन्नती, रिक्त पदे, अधिकारी कर्मचारी कोरोना काळात मयत कर्मचाऱ्यांना तात्काळ 50 लाखांची मदत यासह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला सांगलीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. बेमुदत संपामुळे खरेदी विक्री व्यवहारासह विविध कामे ठप्प झाली आहेत. दरम्यान काही ठिकाणी या संपाला मुद्रांक विक्रेता संघटनेनेही पाठींबा दिला आहे.
आपल्या मागण्यांसाठी राज्य संघटनेची अप्पर मुख्य सचिव, महसुल, मुद्रांक व नोंदणी यांच्याबरोबर गतवर्षी बैठक झाली होती. मागण्यांसदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू पुर्तता न झाल्याने मंगळवारपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरीत करणे. पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू करू नयेत. विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरा, वरिष्ठ लिपिक ,कनिष्ठ लिपिकांच्या जेष्ठता याद्या सन 2018 पासून प्रलंबीत आहेत त्या अंतीम करून तात्काळ प्रसिध्द करा. मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे पदे विभागातील पदोन्नतीने भरण्यात यावीत, कोवीड 19 मुळे मयत झालेले विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटूंबियांना तात्काळ 50 लाखाची मदत देणे व कुटूंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर विभागात नोकरीत सामावून घेण्यात यावे यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे अनेक वेळा अर्ज विनंती केल्या, बैठकाही झाल्या. परंतू निर्णयांची अंमलबजावणीच झाली नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक सल्लागार गोपिनाथ कोळेकर, अध्यक्ष गजानन खोत ,कार्याध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
Previous Articleगणेशोत्सवानंतर सांगलीकरांना वेध नवरात्रौत्सवाचे..!
Next Article कलंबिस्त सावंत समाज भजन मंडळातर्फे गौरव सोहळा








