किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे लोकमान्य रंग मंदिरमध्ये मुद्रण दिन साजरा
प्रतिनिधी / बेळगाव
प्रत्येक क्षेत्रात झपाटय़ाने बदल घडू लागले आहेत. मुद्रण क्षेत्रातही दररोज नवीन बदल होत आहेत. व्यवसायात टिकून रहायचे असेल तर मुद्रण क्षेत्रातील नव्या बदलांना सामोरे जाणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून इतर देशांमध्ये कोणते बदल, तंत्रज्ञान विकसित होत आहे, याची माहिती मिळवून व्यवसाय वाढवा, असे प्रतिपादन तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केले.
बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे बुधवारी लोकमान्य रंगमंदिर येथे ‘मुद्रण दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात किरण ठाकुर बोलत होते. व्यासपीठावर बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष मंगेश देशपांडे, सेपेटरी अरुण चौगुले, उपसेपेटरी राजेंद्र भातकांडे उपस्थित होते.
जाहिरातींचे प्रमाण घटले
कोरोनामुळे जाहिरातींचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. यामुळे वृत्तपत्र क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यातच कागदाचे वाढलेले दर यामुळे वृत्तपत्रांना दर वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु आजही वाचकांची विश्वासार्हता वृत्तपत्रांनी जपली आहे. त्यामुळेच जोवर कागद असेल तोवर वृत्तपत्र आपले अस्तित्व टिकवून ठेवील, असा विश्वास किरण ठाकुर यांनी व्यक्त केला.
डिजिटल क्षेत्रात थ्री-डी प्रिटींग महत्त्वाची
जीएसएस कॉलेजचे प्रा. प्रवीण पाटील यांनी थ्री-डी प्रिटींगबाबत उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होताना दिसत आहे. त्यात सध्या डिजिटल क्षेत्रात थ्री-डी प्रिटींग महत्त्वाची ठरत आहे. या तंत्रज्ञानात वस्तू तयार करण्यासाठी एकावर एक बारीक स्तर चढत जातात. संगणकाच्या साहाय्याने आपल्याला हवी अशी कोणतीही वस्तू आपण तयार करू शकतो, असे त्यांनी सांगितले. कॅनॉनचे जी. प्रकाश यांनीही प्रिंटींगबाबत मार्गदर्शन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मुद्रण कलेचे जनक गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. अनिल चौधरी यांनी केले. बापू जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी कॅनॉनचे व्यवस्थापक जी. प्रकाश, प्रिंट मीडियाचे आमीर, प्रा. एस. वाय. प्रभू यांच्यासह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.









