वार्ताहर / गोडोली
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीबाबत अद्यापही अंतिम कार्यवाही झाली नाही. त्यामुळे दि.१५ आँगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी संबंधीत गावांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जर एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे,” असे जिल्हा परिषदांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुचित केले आहे.
ध्वजसंहितेनुसार ग्रामीण भागात सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ज्या गावांमध्ये सरपंच कार्यरत असतील तिथे तेच स्वातंत्र्यदिनी नियमानुसार ध्वजारोहण करतील. मात्र ज्या ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत. कोरोना संकटामुळे निवडणुका होणार नसल्याने त्या ग्रामपंचायतींवर गावातील योग्य व्यक्तिची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
प्रशासक नियुक्तीबाबत सध्या उच्चन्यायालयाने त्यांच्या अंतरिम आदेशाप्रमाणे अशा ग्रामपंचायतींवर प्राधान्याने शासकीय अधिकारी व नंतर आवश्यक तेथे कारणे देऊन योग्य व्यक्तीस प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे.
तर नागपूर खंडपीठाने संबंधीत शासन निर्णयास स्थगिती दिली आहे. शासनाने प्रशासक नियुक्तीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. या निर्णयास स्थगिती देऊन हे अधिकार शासनाचे आहेत, असे आदेश देण्यात आले. या दोन्ही निर्णयाप्रमाणे शासनास मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तिची प्रशासक म्हणून निवड करणे शक्य होते. पण उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश होत नाही, तोपर्यंत योग्य व्यक्तिची निवड करणे योग्य नाही, असा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठांकडे याबाबत दाखल झालेल्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालय येथील न्या. शिंदे यांच्या खंडपीठाकडे वर्ग केल्या आहेत. मागील आठवड्यात पावसामुळे सुनावणी होऊ शकली नाही. जोपर्यंत अंतिम सुनावणी होऊन निर्णय होत नाही. तोपर्यंत “शासकीय अधिकारीच प्रशासक” म्हणून नियुक्त करण्याची कारवाई झालेली आहे. एका अधिकाऱ्यास त्यांचा मुख्य कार्यभार सोबत ३ ते ४ ग्रामपंचायतींचा प्रशासकाचा कार्यभार याशिवाय कोरोनाची ड्युटी अशा जबाबदाऱ्या संभाळाव्या लागत आहेत.
दि.१५ आँगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी या प्रशासकांनी ध्वजारोहणासाठी एका गावाची निवड करुन त्या ठिकाणी ध्वजारोहण करावे. त्यांच्या कार्यभारामधील उर्वरित गावांमध्ये स्वातंत्र्यसैनिक असतील व ध्वजारोहण करण्यासाठी त्यांची तब्येत उत्तम असेल, तर त्यांना प्राधान्य राहील. अन्यथा तंटामुक्त समिती अध्यक्ष ध्वजारोहण करतील. हे पद रिक्त असल्यास ग्रामसेवक ध्वजारोहण करतील. या तीनपैकी शक्य नसल्यास गटविकास अधिकारी यांनी एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची ध्वजारोहणासाठी नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. “कोरोनाच्या संकटकाळात यासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन झेंडावंदनाचा कार्यक्रम करावा,” असे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी केले आहे.